Friday, April 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नितेश राणे–अबू आझमी आमने सामने

आझमींच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय तापमान वाढले
मुंबई प्रतिनिधी :
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भाषेची पातळी सोडल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नितेश राणे मुसलमानांना “कुराण पठण करायचे असेल तर पाकिस्तानात जा” असे म्हणतात, असा आरोप करत आझमी यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि आक्रमक विधान केले.
“मला जर ताकद मिळाली आणि राणेंची जीभ नाही हासडली, तर मला माझ्या बापाचा मुलगा म्हणून नका,” असे विचित्र वक्तव्य आझमी यांनी केले. याचबरोबर त्यांनी राणेंवर वैयक्तिक पातळीवर जिव्हारी लागणारी टीकाही केली. “तो बुटका मंत्री नेपाळी दिसतो,” अशी अपमानास्पद टिप्पणी करत त्यांनी राणे मशिदीत घुसून मुसलमानांना मारण्याची भाषा करतात, असा आरोप केला.
“आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?” अशी बडबड करत आझमी यांनी राणेंना थेट आव्हान दिले. “तुझ्यात इतका दम असेल तर पोलिसांना बाजूला कर आणि मग मशिदीत ये. तुझी काय अवस्था होते ते पाहा,” असे म्हणत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आजपर्यंत एखाद्या मुस्लिमाने मंदिराबाहेर नारे दिल्याचे तुम्ही पाहिले आहे का, असा सवालही आझमी यांनी उपस्थित केला.
रामनवमीला मुसलमान पाणी वाटप करतात, मात्र काही मंत्री देशात राहायचे असेल तर ‘वंदे मातरम्’ म्हणावे लागेल, अशी धमकी देतात, अशा शब्दांत आझमी यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी याआधी हिंदुत्व, राष्ट्रवाद तसेच रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. आपण हिंदुत्व आणि राष्ट्रवादासाठी काम करतो, सामाजिक किंवा धार्मिक ध्रुवीकरणासाठी नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. धार्मिक मिरवणुकांवरील दगडफेकीबाबत बोलताना त्यांनी ईद किंवा मोहरमदरम्यान असे प्रकार होत नाहीत, मग रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवरच दगडफेक का होते, असा सवाल उपस्थित केला होता.
ईद शांततेत साजरी होत असेल तर रामनवमीदरम्यान गोंधळ का घडतो, असा प्रश्नही राणे यांनी विचारला. आपला कोणत्याही विशिष्ट समुदायाशी किंवा धर्माशी विरोध नसल्याचे सांगत, आपण देशभक्त आणि राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात नाही, मात्र जिहादची भाषा करणाऱ्यांना विरोध करणे स्वाभाविक असल्याचे राणे यांनी म्हटले होते.
या दोन्ही नेत्यांमधील आक्रमक वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनातील भाषेची मर्यादा आणि राजकीय नेत्यांची जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading