क्रेडाई पुणे तर्फे ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे आयोजन
पुणे : क्रेडाई पुणे यांच्या वार्षिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचा २४ वा आवृत्ती असलेला ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ दि. १६ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान अॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. आतापर्यंतचा हा क्रेडाईचा सर्वात मोठा एक्स्पो असून, यात ८५ हून अधिक विश्वासार्ह विकासक सहभागी होणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए परिसरातील ४०० पेक्षा अधिक रेरा-नोंदणीकृत प्रकल्प येथे सादर करण्यात येणार आहेत.
घर खरेदीदार व गुंतवणूकदारांसाठी हा एक्स्पो एक व्यापक व्यासपीठ ठरणार असून, परवडणाऱ्या घरांपासून लक्झरी घरे, को-लिव्हिंग व सीनियर लिव्हिंग प्रकल्प, एनए प्लॉट्स, प्रीमियम व्हिला तसेच ग्रेड-ए कमर्शियल प्रॉपर्टीज असा विविध पर्याय येथे उपलब्ध असणार आहे.
‘पूना टू पुणे’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात शहराचा ऐतिहासिक प्रवास आणि भविष्योन्मुख, शाश्वत विकास अधोरेखित केला जाणार आहे. प्रदर्शनादरम्यान विविध आकर्षक उपक्रमांसह मानवी साखळीचा प्रतीकात्मक उपक्रमही राबविण्यात येणार आहे.
या एक्स्पोचे उद्घाटन दि. १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. अभय फिरोदिया, अध्यक्ष, फोर्स मोटर्स लिमिटेड यांच्या हस्ते होणार असून, डॉ. आनंद देशपांडे, संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पर्सिस्टंट सिस्टीम्स हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात तात्काळ डील्स, नामांकित वित्तसंस्थांकडून गृहकर्ज सहाय्य, लकी ड्रॉ आणि आकर्षक भेटवस्तू अशी विशेष आकर्षणे असणार आहेत.
मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला दि. १५ जानेवारी २०२६ रोजी चॅनल पार्टनर्स व विकासकांसाठी देशातील सर्वात मोठा नेटवर्किंग कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यात सुमारे १,००० चॅनल पार्टनर्स सहभागी होणार आहेत. या परिषदेत ग्राहक ट्रेंड्सवर नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची सत्रे, विक्रीतील एआयवर आधारित सत्रे तसेच वरिष्ठ विकासकांकडून बाजारातील ट्रेंड्सवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. मनीष जैन म्हणाले, “पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हे रिअल इस्टेट क्षेत्रातील विश्वासार्हता, पारदर्शकता आणि जबाबदार वाढ यांप्रती क्रेडाई पुणेची बांधिलकी दर्शवते. केवळ क्रेडाई सदस्यांचे, ८५ हून अधिक विश्वासार्ह व रेरा-नोंदणीकृत प्रकल्प येथे सादर करण्यात येत असून, परवडणाऱ्या घरांपासून प्रीमियम व लक्झरी निवासस्थानांपर्यंत विस्तृत पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी १८,००० हून अधिक नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर, यंदाच्या प्रदर्शनातून आणखी मोठी गती निर्माण होण्याची अपेक्षा आहे. पुणे हे मालमत्ता गुंतवणुकीसाठी अग्रगण्य शहरांपैकी एक असून, या एक्स्पोमध्ये ४०० पेक्षा अधिक रेरा-प्रमाणित प्रकल्प पाहायला मिळणार आहेत.”
या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली विकासकांशी थेट संवाद, सविस्तर माहिती आणि विविध मालमत्तांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
