इम्तियाज जलील यांच्या वाहनावर कार्यकर्त्यांचा हल्ला
जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा व्यक्त झाला संताप
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलमीन पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला होता. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या लोकांना उमेदवारी दिल्याबद्दल हा संताप व्यक्त झाल्याचे एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
एमआयएम उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले इम्तियाज जलील यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. त्यानंतर हिंसक झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर हल्लाही केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून संतप्त कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये स्थानिक समस्या दूर करण्यासाठी नगरसेवकाची सर्वसामान्य नागरिकांना गरज असते. मात्र, अनेक ठिकाणी जलील यांनी स्थानिक उमेदवार देण्याऐवजी बाहेरचे उमेदवार लादले आहेत. प्रभागापासून दह किलोमीटर लांब राहणारे उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे संताप व्यक्त होणारच, असा एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा दावा आहे.
या सर्व प्रकारावर आपल्याला कोणतेही भाष्य करायचे नाही, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले. लोकशाहीमध्ये मला कुठेही जाण्याचा, पदयात्रा करण्याचा, पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार करण्याचा हक्क आहे. मला दाखवण्यात आलेल्या काळ्या झेंड्यांचा अर्थ 16 तारखेनंतर स्पष्ट होईल, असेही जलील यांनी नमूद केले.
