Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली; शरद पवारांनी घेतली भेट

पुणे-ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह समाजात मोठी चिंता निर्माण झाली आहे.आढाव यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः रुग्णालयात पोहोचले. त्यांनी वैद्यकीय पथकाकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली तसेच परिवाराशी देखील संवाद साधून धीर दिला. पवारांनी डॉक्टरांशी चर्चा करत उपचाराची प्रगती तपासली आणि गरज भासल्यास अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयाशी संबंधित समस्येमुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि त्यांच्या टीमकडून आवश्यक उपचार चालू आहेत. नातेवाईकांनी सांगितले की, प्रकृती गंभीर असली तरी आत्ता ती स्थिर आहे. डॉक्टर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. काही वेळापूर्वी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक काळजीपूर्वक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

बाबा आढावांच्या कुटुंबीयांनी जनतेला एक महत्वाची विनंती केली आहे. त्यांनी सांगितले, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. चुकीच्या माहितीमुळे गैरसमज निर्माण होतात. म्हणून केवळ कुटुंबीयांकडून किंवा अधिकृत सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच बाबा आढाव यांच्या आरोग्याविषयी घडामोडी योग्य वेळी जनतेपर्यंत पोहोचवल्या जातील, असेही स्पष्ट केले आहे.

सामाजिक चळवळीतील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा आढाव यांच्या आरोग्याबाबत अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही अनेकांनी केले आहे. महाराष्ट्रातील कामगार, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या या ज्येष्ठ समाजसेवकांचे स्वास्थ्य लवकर सुधारावे, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading