महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र नाही; शरद पवारांचा निर्वाळा
पुणे प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रितपणे लढणार नसल्याचा निर्वाळा शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी जगताप यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवली अथवा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली तर काय होऊ शकते, याचा सविस्तर आढावा शरद पवार यांच्यासमोर मांडला. यावेळी शरद पवार यांनी आपला पक्ष अजित पवार गटाबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही पवार यांनी दूरध्वनी द्वारे ही माहिती दिली असेही जगताप यांनी सांगितले.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीत युती आणि आघाडी लयाला जाऊन अनेक पक्षांची विचित्र सरमिसळ झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ज्या ठिकाणी आहे, किमान त्या ठिकाणी तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे, अशी भावना काही नेत्या कार्यकर्त्यांनी वारंवार व्यक्त केली होती. मात्र, शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
