सुमधुर व्हायोलिन वादन आणि सुश्राव्य गायनाने सूर महती महोत्सवाला सुरुवात
स्व. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांना महोत्सवाद्वारे आदरांजली
पुणे : ख्यातनाम गायिका, संगीतकार डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर यांच्या सूर महती फाउंडेशनच्या वतीने आजपासून संपन्न होत असलेल्या सूर महती महोत्सव २०२५ ची सुरुवात यज्ञेश रायकर यांचे सुमधुर व्हायोलिन वादन आणि रचना बोडस यांच्या सुश्राव्य गायनाने झाली.
महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून स्वारगेट येथील नेहरू स्टेडीयम शेजारील गणेश कला क्रीडा मंच येथे हा महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाच्या सुरुवातीला अक्षय जोशी व मंदार सोहनी गुरुजी यांनी मंत्रोच्चार केले. यानंतर दीप प्रज्वलनाने महोत्सवाला औपचारिक सुरुवात झाली. यावेळी प्रमुख प्रायोजक इंदिरा विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार चेतन वाकलकर, डॉ हरी सहस्त्रबुद्धे, सूर महती फाऊंडेशनचे रवींद्र व मानसी खांडेकर आणि अतुल खांडेकर व भक्ती खांडेकर आदी उपस्थित होते. यानंतर इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या लिबरल आर्ट्स च्या विद्यार्थ्यांनी ‘जय जगदीश हरे…’ ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची प्रार्थना प्रस्तुत केली.
प्रसिद्ध व्हायोलिन वादक, गुरु पं. मिलिंद रायकर यांचे शिष्य व सुपुत्र, युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने महोत्सवाला सुरुवात झाली. डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचा मी भक्त असून त्यांच्या नावाने सुरू असलेल्या या महोत्सवात मला सादरीकरण करण्याची मिळालेली संधी मी महत्त्वाची मानतो असे सांगत डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचा राग तिलक कामोद ऐकत मी तो राग शिकलो म्हणून आज तोच सादर करीत आहे असे यज्ञेश रायकर म्हणाले. यानंतर त्यांनी राग तिलक कामोद ची बहारदार प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी झपतालमधील पारंपरिक बंदिश ‘तीरथ को…’ आणि डॉ वीणा सहस्त्रबुद्धे यांचा तराना सादर केला. यानंतर गुरु डी. के. दातार यांची एक तालातील गत त्यांनी प्रस्तुत केली. स्वरचित मिश्र काफी रागातील रचनेने त्यांनी समारोप केला. रायकर यांना तबल्यावर भरत कामत यांनी समर्पक साथसंगत केली. पार्थ देशमुख व पार्थ कुलकर्णी यांनी तानपुरासाथ केली.
महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात पं. काशिनाथ बोडस आणि डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्या असलेल्या अमेरिकास्थित रचना बोडस यांचे शास्त्रीय गायन संपन्न झाले. त्यांनी यावेळी राग वाचस्पती सादर केला. या मध्ये त्यांनी ‘साचो तेरे नाम…’ ही विलंबित एकतालमधील पारंपरिक रचना आणि ‘चतुर सुघर बलमा…’ ही मध्यलय अध्दा तीन तालातील रचना सादर केली. त्यानंतर त्यांनी द्रुत तीन तालातील तराना गायला. राग दुर्गा मध्ये ‘अंबे दुर्गे…’ ही तीन तालातील रचना आणि द्रुत तीन तालातील तरानाही त्यांनी प्रस्तुत केला. संत कबीरांच्या ‘यहाँ तना थाट तंबुरे का…’ हे भजन गात त्यांनी समारोप केला. रचना बोडस यांना प्रणव गुरव (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी), सायली कुलकर्णी व चिन्मयी ओक (तानपुरा) यांनी साथसंगत केली. स्वानंद पटवर्धन यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले. महोत्सवासाठी इंदिरा विद्यापीठ, एसबीआय, विलास जावडेकर डेव्हलपर्स, सुमा, एल आय सी यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे.
