इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स आणि इन्व्हेस्को यांच्याकडून मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील संयुक्त कंपनी स्थापनेची प्रक्रिया पूर्ण
मुंबई : इंडसइंड बँकेची प्रवर्तक असलेली इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (आयआयएचएल) आणि इन्व्हेस्को लिमिटेड या कंपन्यांनी आज भारतात मालमत्ता व्यवस्थापन (अॅसेट मॅनेजमेंट) या क्षेत्रातील आपल्या संयुक्त कंपनी स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली. सर्व नियामक मंजुरी व आवश्यक अटी पूर्ण झाल्यानंतर ‘आयआयएचएल’चा ‘इन्व्हेस्को अॅसेट मॅनेजमेंट इंडिया’मध्ये (आयएएमआय) साठ टक्के मालकीहक्क राहणार असून ‘इन्व्हेस्को’कडे उर्वरित चाळीस टक्के भागभांडवल राहणार आहे. विद्यमान नियामक चौकटीअंतर्गत आयआयएचएल आणि इन्व्हेस्को या दोन्ही कंपन्या संयुक्त प्रवर्तक (जॉइंट स्पॉन्सर) म्हणून कार्यरत राहतील. सप्टेंबर २०२५ रोजीनुसार, आयएएमआय ही देशांतर्गत मालमत्ता व्यवस्थापन करणारी भारतातील सोळाव्या क्रमांकाची संस्था आहे. तिच्याकडे देशांतर्गत आणि परदेशी (सल्लागार माध्यमातून) मिळून सरासरी १,४८,३५८ कोटी रुपये इतकी व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) आहे. कंपनीचा व्यवसाय देशभरातील ४० शहरांमध्ये पसरलेला आहे. ‘आयआयएचएल’चे अध्यक्ष अशोक हिंदुजा म्हणाले, “इन्व्हेस्कोसोबतच्या या संयुक्त कंपनीविषयी आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. या माध्यमातून आमच्या ‘पॅरा बँकिंग’ पोर्टफोलिओमध्ये मालमत्ता व्यवस्थापन (अॅसेट मॅनेजमेंट) या क्षेत्राचा समावेश करून, २०३०पर्यंत जागतिक दर्जाची वित्तीय (बीएफएसआय) शक्ती बनण्याचे आमचे ध्येय आहे. वाढती उत्पन्नपातळी, अनुकूल लोकसंख्या रचना आणि प्रचंड गुंतवणूक संधी यांमुळे भारत सध्या सुवर्णकाळ अनुभवत आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी आणि परदेशातील भारतीय समुदायासाठीही हा काळ अत्यंत अनुकूल आहे. आम्ही शेवटच्या घरापर्यंत, शेवटच्या गुंतवणूकदारापर्यंत पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि गुंतवणूकदारांच्या ‘म्युच्युअल फंड सही है’ या विश्वास खरा ठरवू.” ‘इन्व्हेस्को’चे आशिया पॅसिफिक या क्षेत्रासाठीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू लो म्हणाले, “गेल्या नऊ वर्षांत आमच्या भारतातील व्यवसायाने मोठी वाढ साधली आहे. आता ‘आयआयएचएल’सोबतच्या या भागीदारीमुळे आम्ही देशांतर्गत बाजारातील वितरण क्षमता वाढविण्यास उत्सुक आहोत. भारतातील ग्राहकांना जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूक कौशल्यांचा संगम असलेली उत्कृष्ट गुंतवणूक उत्पादने व सेवा पुरविण्यावर आमचे लक्ष नेहमीप्रमाणे केंद्रित राहील.” या घोषणेवर भाष्य करताना ‘इन्व्हेस्को अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया)’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ नानावटी म्हणाले, “या धोरणात्मक व्यवहाराची यशस्वी पूर्तता झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. ही संयुक्त कंपनी म्हणजे अॅसेट मॅनेजमेंटमधील ‘इन्व्हेस्को’चे जागतिक कौशल्य आणि ‘आयआयएचएलचा’ स्थानिक बाजारातील सखोल अनुभव यांचा संगम आहे. या भागीदारीद्वारे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये (टियर-२ आणि टियर-३) आमच्या वितरण जाळ्याचा विस्तार करणे, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून गुंतवणुकीच्या उच्च दर्जाच्या उपाययोजना भारतभरातील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच, गिफ्ट सिटी, एसआयएफ (स्ट्रक्चर्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स), पॅसिव्ह प्रॉडक्ट्स आणि डिजिटल चॅनेल्स यांच्या माध्यमातून उत्पादनांची श्रेणी वाढवण्याचा व विस्तार करण्याचा मानस आम्ही बाळगतो.” या संयुक्त कंपनीमध्ये दोन्ही भागीदार आपापली बलस्थाने योगदान स्वरूपात आणत आहेत. इन्व्हेस्को आपल्या जागतिक गुंतवणूक व्यवस्थापन कौशल्याचा आणि विविध उत्पादनांच्या श्रेणीचा लाभ देईल, तर आयआयएचएल आपल्या प्रवर्तक संस्था व उपकंपन्यांमार्फत भारतभरातील अकरा हजारांहून अधिक केंद्रांवर (टचपॉइंट्स) पसरलेल्या सक्षम वितरण जाळ्याचा आधार देईल. सध्या या जाळ्यातून साडेचार कोटी ग्राहकांना सेवा पुरविण्यात येते. याशिवाय, आयआयएचएल आपल्या जागतिक भागधारकांच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून परस्परपूरक व्यावसायिक कामांच्या साहाय्याने हा ग्राहकवर्ग अजून पाच कोटींनी वाढवण्याचा विचार करीत आहे. दोन्ही कंपन्यांतील हा संयुक्त उपक्रम पुढेही सौरभ ननावटी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान व्यवस्थापनाखाली कार्यरत राहील. गुंतवणुकीतील उत्कृष्टता आणि ग्राहकसेवेवर भर याविषयीच्या ‘आयएएमआय’च्या धोरणात कोणताही बदल होणार नाही. २००८ पासून ‘आयएएमआय’च्या गुंतवणुकीत केंद्रस्थानी असलेली शिस्तबद्ध, संशोधनाधारित गुंतवणूक तत्त्वे व प्रक्रिया याच पद्धतीने सुरू राहतील, त्यामुळे गुंतवणूकदार, वितरक आणि इतर हितधारकांसाठी स्थैर्य आणि सातत्य कायम राहील. मोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स यांनी ‘आयआयएचएल’चे विशेष वित्तीय सल्लागार म्हणून काम केले, तर क्रॉफर्ड बेली आणि एझेडबी अँड पार्टनर्स यांनी अनुक्रमे आयआयएचएल आणि इन्व्हेस्को यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून भूमिका निभावली. दिवंगत एस. पी. हिंदुजा आणि त्यांच्या तीन भावांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली १९९३ साली स्थापन झालेली इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (आयआयएचएल) ही एक गुंतवणूक होल्डिंग कंपनी असून ती मॉरिशस वित्तीय सेवा आयोगाच्या नियमनाखाली ग्लोबल बिझनेस लायसन्स अंतर्गत कार्यरत आहे आणि संचालक मंडळाच्या देखरेखीखाली चालवली जाते. आयआयएचएलच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविध नियामक क्षेत्रांअंतर्गत पुढील सेवा समाविष्ट आहेत – बँकिंग सेवा : इंडसइंड बँक, आयआयएचएल बँक अँड ट्रस्ट लिमिटेड (बहामाज); भांडवली बाजार मालमत्ता : आफ्रिनेक्स एक्स्चेंज लिमिटेड (मॉरिशस), यावर सध्या अमेरिकन डॉलर १३.५ अब्ज मूल्याच्या मालमत्तांची नोंद आहे. अलीकडेच, ‘आयआयएचएल’ने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या विमा व्यवसायाचे (आयुर्विमा, सर्वसाधारण विमा आणि आरोग्यविमा) तसेच सिक्युरिटीज व्यवसायाचे अधिग्रहण केले आहे. ‘आयएएमआय’ने भारतात आपले कार्य २००८ च्या अखेरीस लोटस इंडिया अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे अधिग्रहण करून सुरू केले. त्यानंतरपासून कंपनीने सातत्याने वाढ साधत आजपर्यंत २९ लाखांहून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांचे फोलिओ आणि ४८,००० हून अधिक नोंदणीकृत वितरकांचे जाळे उभे केले आहे. कंपनीच्या एकूण मालमत्ता व्यवस्थापनापैकी सत्तर टक्क्यांहून अधिक हिस्सा इक्विटी आणि इक्विटी-केंद्रित मालमत्तांमध्ये गुंतलेला आहे. याशिवाय, इन्व्हेस्को हैदराबाद येथे एक एंटरप्राइझ सेंटर चालवते. तेथे १,७०० पेक्षा अधिक कर्मचारी विविध जागतिक सहाय्यक कार्यांमध्ये (उदा. माहिती तंत्रज्ञान, गुंतवणूक व्यवहार, वित्त, अनुपालन आणि मनुष्यबळ विकास) कार्यरत आहेत.
Read More