Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

वेदविद्या पुरस्कार वितरण सोहळा रविवारी

पुणे : वेदांची दिव्य परंपरा आणि ज्ञानसंपदेचा अखंड प्रवाह जपणाऱ्या शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन समिती तर्फे आयोजित वेदविद्या पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पुण्यातील सारसबागेजवळ, सणस मैदानासमोर, वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी आणि वेदविद्या समिती अध्यक्ष प्रा.रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला रवींद्र मुळे यांच्यासह अहिताग्नी सुधाकर पंत कुलकर्णी, प्रा. डॉ. संजय देवडीकर, वेदमूर्ती कुणाल शिंगणे, वेदमूर्ती सुजित देशमुख, वेदमूर्ती महेश नंदे गुरुजी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस आदी मान्यवर उपस्थित होते.

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी च्या पूर्वसंध्येचे देखील औचित्य या समारंभास आहे. या कार्यक्रमात वेदमूर्ती विजय भालेराव यांना वैदिक घनपाठी पुरस्कार, वेदमूर्ती राहुल बेळे यांना वैदिक अध्यापक पुरस्कार तसेच अथर्व हरिदास, हर्षद कुलकर्णी, प्रसन्न कुलकर्णी, सोमनाथ जोशी यांना वैदिक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे आहे.

याशिवाय श्री राजेश्वर देशमुख शास्त्र पाठशाळा, संत नामदेव महाराज वेद विद्यालय, औंढा नागनाथ, ब्रह्मचैतन्य याज्ञिक पाठशाळा, अध्यात्मिक प्रतिष्ठान, आळंदी, जीवन ज्योती प्रतिष्ठान पिरंगुट या पाच वैदिक पाठशाळांना प्रत्येकी ११ हजार रुपये छात्र भोजनासाठी प्रदान करून शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ आपल्या वेदविद्येच्या प्रसारासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे.

तसेच माणिक शेठ दुधाने यांना ज्ञानेश्वरी प्रदान करण्यात येणार आहे.त्याच वेळी कै. रत्नमाला व कै गजानन जोशी स्मरणार्थ दिला जाणारा सेवारत्न पुरस्कार विवेक गोपाळ कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र आणि रोख रक्कम रू ११,०००/- असे आहे.

सन २००९ पासून समितीतर्फे आपल्या प्राचीन वेदविद्येच्या संवर्धनासाठी सुरू असलेली ही गौरवशाली परंपरा आजही नव्या उत्साहाने पुढे नेली जात आहे. वेदांचा अभ्यास, पठण आणि अध्यापन करणाऱ्या विद्वानांचा सन्मान करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. श्रद्धा, संस्कार आणि अध्यात्माचा संगम असलेला हा सोहळा वेदविद्येच्या तेजाला नवचैतन्य देणारा ठरणार आहे. शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ तर्फे सर्व वेदप्रेमी, अभ्यासक आणि समाज बांधवांना या मंगल प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading