Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ

 

९० हजार कुत्र्यांचा बन्दोबस्त कुठे करणार

सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे काय?

मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) – मुंबई शहर उपनगरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून पालिकेच्या वतिने करण्यात आलेली नसबंदी त्यावर कायमस्वरुपी उपाय नसल्याचे दिसून आले आहे. वर्षभरात ७० हजाराहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून त्यांच्या दहशतीमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक हल्ला हा लहान मुलांवर होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त निवारा केंद्रात करण्यात यावा, त्याठिकाणी त्यांची योग्य ती काळजी घेण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन तात्काळ करावे, अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.

नसबंदी केल्यानंतरही भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालिकेची नसबंदी योजना पुर्णपणे फसली आहे. भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ला होण्याच्या घटनेत वाढ होत असून गेल्या वर्षभरात ७० हजाराहून अधिक नागरिकांना कुत्र्यांकडून चावा घेण्यात आला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणांवरील कुत्र्यांचा निवारा केंद्रात बंदोबस्त करण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश राज्यांनाही देण्यात आल्याने नागरिकांनी त्यावर समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, मुलुंड पुर्वेकडील साईनाथ चौक, म्हाडा कॉलनी, न्यु पीएमजीपी वसाहत, संभाजी हॉल तर भांडुप मध्ये हनुमान नगर, प्रताप नगर, जमिल नगर, सोनापूर परिसर, नेव्हल डॉकयार्ड वसाहत तसेच घाटकोपर असल्फा व्हिलेज, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गेल्या अनेक वर्षांपासून चालू असून कुत्र्यांच्या वाढीला पायबंद घालण्यासाठी नसबंदी सारखा उपाय देखील फोल ठरला आहे. पदपथ, रस्ते, शाळा महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. कोणत्याही वेळी कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला केला जातो. शिवाय रस्त्यांवरुन जाणा-या दुचाकीस्वारांच्या मागे लागल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. लहान मुलांवर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला करण्याच्या घटना गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द मध्ये घडल्या आहेत. गेल्या काही वर्षात १ लाख २० हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. तरीही भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त निवारा केंद्रात करण्यात यावा, अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.

मुंबई शहर उपनगरात सुमारे ९० हजारांहून अधिक भटके कुत्रे असून, त्यांच्यासाठी केवळ आठच अधिकृत निवारा केंद्र असल्याचे पालिकेच्यावतिने सांगण्यात आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी पालिका कशी करते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading