तिसऱ्या ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीयर लीग’ फुटबॉल स्पर्धेचे १५ नोव्हेंबर पासून आयोजन !!
पुणे : पुण्यातील मानांकित आणि ४० वर्ष जुना व आपला इतिहास असलेल्या डेक्कन इलेव्हन क्लबच्यावतीने तिसऱ्या ‘डेक्कन इलेव्हन प्रिमीअर लीग’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा शनिवार, १५ नोव्हेंबर पासून कर्वेनगर येथील सेवासदन शाळेच्या मैदानावर सुरू होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन इलेव्हनचे सुनिल देशपांडे आणि अनिल देशपांडे यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून या वर्षी ९, १३ आणि १६ वर्षाखालील गटात सुमारे १८० हुन अधिक मुले आणि मुली खेळाडू सहभागी झाले आहेत. राजनोज इलेव्हन, स्कॉर्पीयन इलेव्हन, बुल्स् इलेव्हन, वुल्व्हज् इलेव्हन, डॉल्फीन इलेव्हन आणि टायगर्स इलेव्हन अशा या सहा संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पहावयास मिळणार आहे. प्रत्येक संघात एक मुलगी खेळाडू सहभागी होणार असून गतवर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा मुलींचा सहभाग उत्साह वाढवणारा आहे. ही स्पर्धा आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दोन दिवशी होणार आहे.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात येणार आहेत. तसेच सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वाधिक गोल करणारा खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे
