मणिपूर येथील लोंगपी ब्लॅक स्टोन पॉटरी व बनाना फायबर हँडीक्राफ्ट ची पुणेकरांना भुरळ
पुणे : एखाद्या काळ्या दगडाचा वापर करून त्यामधून स्वयंपाकासाठीची भांडी तयार केली असतील तर त्यामध्ये तयार होणाऱ्या पदार्थांची चव निश्चितच वेगळी राहील. मणिपूर मधल्या लोंगपी गावात आढळणाऱ्या लोंगपी ब्लॅक स्टोन (काळ्या दगडापासून) आकर्षक भांड्यांची भूरळ पुणेकरांना पडली आहे. देशभरातील संस्कृतीची रूपे एकाच छताखाली अनुभविण्याची संधी देणारा कारीगर बाजार येत्या ९ नोव्हेंबर दरम्यान कॅम्प परिसरातील रेसिडन्सी क्लब समोरील डच पॅलेसमध्ये भरला असून तिथे येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष ही भांडी वेधत आहेत.
पूर्णपणे हाताने तयार करण्यात आलेल्या या भांड्यांच्या निर्मितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करण्यात आलेला नाही.लोंगपी ब्लॅक स्टोनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या भांड्यामधे शिकवलेल्या पदार्थांची चव खूपच चवदार लागते. त्यामुळे देशातल्या अनेक भागातील लोकांना या भांड्यांची भुरळ पडत असल्याचे या भांड्यांची विक्री करणाऱ्या पाम नागसाईनो यांनी सांगितले.
मणिपूरमध्ये लोंगपी ब्लॅक स्टोनपासून तयार करण्यात आलेली भांडी प्रसिद्ध आहेत. मात्र, अन्य ठिकाणी त्याचे महत्व अलीकडच्या काळात वाढू लागले आहे. या दगडापासून तयार करण्यात येणाऱ्या भांड्याना आकार देण्यापासूनची सगळी प्रक्रिया हाताने करण्यात येते, त्यामुळे ती भांडी इतरांपेक्षा वेगळी दिसतात. भांडी तयार करण्यासाठीचा कालावधी हा किमान एक आठवडा ते पंधरा दिवसांपर्यंत असल्याचे नागसाईनो सांगतात. इंडक्शन वगळता अन्य ठिकाणी या भांड्यांचा वापर अन्न शिजवण्यासाठी करता येऊ शकतो. लोंगपी ब्लॅक स्टोनमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असल्यामुळे त्याचा चांगला फायदा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केळीच्या खुंटापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू देखील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. केळीच्या झाडाच्या बुंध्याचा वापर करून त्यावर विशिष्ठ अशी प्रक्रिया करून विविध आकारातील आकर्षक बाउल्स, बॅग्स, लॅम्पशेड तयार करण्यात येतात. नैसर्गिक वस्तूपासून त्याची निर्मिती करण्यात आलेली असल्याने ग्राहक त्याला अधिक पसंती देतात. केळीच्या झाडाला आलेली केळी काढल्यानंतर त्याचा बुंधा काढून टाकतात. मात्र, त्याचा वापर करून चांगल्या प्रकारच्या वस्तू तयार करण्यात येत असून त्याला चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, त्यामुळे इथल्या मातीमध्ये अनेक कलाकार आपल्यामधील कला गुणांना वाव देत, वेगळी कलाकृती तयार करत असतात. कारीगर बाजारमध्ये देखील देशाच्या अनेक भागातील कारागीर मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. देशाच्या विविध भागातील विणकाम असलेल्या, भरतकाम केलेल्या साड्या, आदिवासी कला आणि संस्कृतीशी संबंधित अनेकविध वस्तू, शाश्वत कला आणि पर्यावरण पूरक नवोपक्रम, वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने, सजावटीचे सामान, घर सजावटीच्या वस्तू पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी इथे उपलब्ध आहेत. जयपुरी बांगड्या, मिर्झापूर येथील रग बनविण्याचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रातील मातीकाम आणि लाकूडकाम यांचे प्रात्यक्षिक याबरोबरच मधुबनी चित्रकला, विणकाम, ब्लॉक प्रिंटिंग, कपड्यांना पर्यावरणपूरक डाय करणे, लाखेच्या बांगड्या बनविणे अशा कार्यशाळा देखील इथे घेण्यात येत आहेत.
