तामिळनाडूचे दुष्यंत गुणशेखर यांना यावर्षीचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर
पुणे : आपल्या क्रिया शक्ती या नाट्यसमूहाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर भाष्य करणारी नाटके रंगमंचावर आणणाऱ्या, रंगभूमी कलाकारांना शाश्वत उत्पन्न व सुरक्षितता प्रदान करण्यासाठी केली १३ वर्षांपासून प्रयत्नशील असणाऱ्या आणि तमिळनाडूमध्ये रंगभूमीशी संबंधित अभ्यासक्रम विकसित करून खाजगी व सार्वजनिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये रंगभूमीविषयी आस्था निर्माण करण्यासाठी कार्यरत असलेल्या दुष्यंत गुणशेखर यांना यंदाचा प्रतिष्ठित असा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. पुण्यातील रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी, सायं ७ वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे होणाऱ्या विशेष समारंभात सदर पुरस्कार गुणशेखर यांना प्रदान करण्यात येईल. समकालीन भारतीय रंगभूमीचे प्रसिद्ध दिग्दर्शक, शिक्षक आणि अभ्यासक, आधुनिक भारतीय नाट्य क्षेत्रातील डिजिटल थिएटरचे अग्रणी म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉ. अभिलाष पिल्लई यांच्या हस्ते गुणशेखर यांना हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२५ प्रदान केला जाईल. यावेळी डॉ. पिल्लई हे ‘रिइमॅजिन दी रिंग: दी इंडीयन सर्कस बिटवीन ट्रॅडिशन, थिएटर अँड दी फ्युचर’ या विषयावर बीजभाषण करतील अशी माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी कळविली आहे.

तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराचे हे १८ वे वर्ष असून थिएटर अर्थात रंगभूमी या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या तरुण पिढीतील कलाकारांना दरवर्षी सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २००४ मध्ये तन्वीरच्या स्मृतिसाठी तन्वीरचे आई-वडील दीपा व डॉ. श्रीराम लागू यांनी या पुरस्काराची सुरूवात केली आहे.
दुष्यंत गुणशेखर यांच्याविषयी – फॉरेन्सिक ऑडिटची पार्श्वभूमी असलेल्या दुष्यंत गुणशेखर यांनी वयाच्या २३ व्या वर्षी स्वतःची थिएटर कंपनी सुरू केली. ‘कुथु-पी-पट्टाराय’ आणि ‘मॅजिक लँटर्न’ मधील व्यावसायिक कलाकारांमुळे शालेय वयातच त्यांना रंगभूमीची आवड निर्माण झाली होती. शिक्षक आणि मार्गदर्शकांच्या सल्ल्याने आणि अनुभवाने गुणशेखर यांनी रंगभूमी अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा घेऊन २०१२ मध्ये ‘क्रिया-शक्ती’ या नाट्य समूहाला सुरुवात केली. तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व रंगभूमी कलाकारांना शाश्वत उत्पन्न आणि सुरक्षितता प्रदान करणे हा या नाट्य समूहाचा उद्देश आहे.
आजवर मागील १३ वर्षांच्या प्रवासात नाट्यसमूहाच्या वतीने विविध शैलींमध्ये मूळ नाटके सादर करण्यात आली असून यामध्ये तमिळ आणि इंग्रजी भाषेतील नाटकांचा समावेश आहे. ही नाटके बहुतांश वेळी सामाजिक समस्यांना संबोधित करत असून तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या अनुभवांमधून सांगितली जातात. महेश दत्तानी, जरीन शिहाब आणि अभिषेक कुमार यांच्यासह अनेक दिग्गजांनी ‘क्रिया-शक्ती’ला वेळोवेळी सहकार्य केले आहे. ‘क्रिया-शक्ती’ने त्यांच्या नाटकांद्वारे ८०० हून अधिक कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे आणि त्यांच्या कामगिरीच्या निर्मितीतील योगदानासाठी त्यांना निधी देखील दिला आहे. गेल्या १३ वर्षांत तामिळनाडू सोबतच देश व विदेशात ९० हून अधिक नाटके आणि त्यांचे १७०० प्रयोग सादर झाले आहेत. याबरोबरच तरुण प्रेक्षकांना रंगभूमीकडे आणण्यासाठी, ‘क्रिया-शक्ती’ने तामिळनाडूमधील खाजगी आणि सार्वजनिक शाळांमध्ये एक रंगभूमीविषयक अभ्यासक्रम विकसित केला असून तो अंमलात आणण्यासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना समीक्षात्मक विचारसरणी व संवाद यांसारखी आवश्यक कौशल्ये शिकविल्या जातात हे विशेष.
‘क्रिया-शक्ती’ मधील सर्व प्रशिक्षक पूर्णवेळ रंगकर्मी असून त्यांना पगारासह पीएफ व वैद्यकीय लाभ मिळतात. २०१२ मध्ये एका शाळेपासून सुरु झालेला ‘क्रिया- शक्ती’चा हा प्रवास आज २०२५ मध्ये १४० हून अधिक भागीदार शाळा आणि एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.
