पुणे जिल्हा महिला संघाला विजेतपद !!
‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ ज्युनिअर गट मुलींची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२५ !!
पुणे : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ ज्युनिअर मुलींच्या गटाच्या (१५ वर्षाखालील) फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्हा महिला संघाने मुंबई संघाचा ३-१ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. पुणे जिल्हा संघाने सलग दुसऱ्या वर्षी या गटाचे विजेतेपद मिळवून आपले निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले.
शिरपुर, धुळे येथील मुकेश पाटील शालेय मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पुणे जिल्हाने आक्रमक सुरूवात करून दहाव्याच मिनिटाला पहिले यश मिळवले. कर्णधार शर्वरी माने हिने गोल करून संघाचे खाते उघडले. पुणे संघाने आघाडीवर राहून अचूक पासिंग आणि चेंडूवर नियंत्रण अधिक काळ ठेवले. २७ व्या मिनिटाला अर्णा सिंधव हिने गोल करून पुणे संघाचा आघाडी २-० अशी वाढवली. पुर्वार्धाच्या जादाच्या वेळेत शर्वरी माने हिला मिळालेल्या संधीच्या जोरावर तिने वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा गोल करून ३-० अशी सामन्यावर पकड मिळवली. उत्तरार्धात पुणे संघाला गोल करण्यात अपशय आले परंतु त्यांनी संघाची आघाडी कमी होणार नाही, याची काळजी घेतली. शानवी चौबे हिने ५४ व्या मिनिटाला गोल करून मुंबई संघाकडून एकमेव गोल केला आणि आघाडी १-३ अशी कमी केली. अंतिम क्षणापर्यंत पुणे संघाने आणखी गोल होणार नाही, याची काळजी घेतली आणि विजेतेपदावर शिक्कमोर्तब केले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पुणे संघाची कर्णधार शर्वरी माने हिला मिळाला. गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ मध्ये जळगांवर येथे झालेल्या या स्पर्धेच्या आवृत्तीमध्ये पुणे संघाने मुंबई संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. या वर्षीसुध्दा पुणे संघाने आपली ही विजयी परंपरा कायम ठेवून विजेतेपद जिल्ह्याकडेच राखून ठेवले.
सामन्याचा सविस्तर निकालः अंतिम सामनाः
पुणे जिल्हाः ३ (शर्वरी माने १०, ३०+२ मि., अर्णा सिंधव २७ मि.) वि.वि. मुंबई संघः १ (शानवी चौबे ५४ मि.); पुर्वार्धः ३-०;
