Wednesday, June 3, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNE

मराठयांचा इतिहास पुढे नेण्यासाठी एकत्रितपणे काम करणार – अभिनेत्री प्राजक्ता माळी

व्यवस्थापनाच्या तांत्रिक कामामुळे ३ नोव्हेंबर रोजी शिवसृष्टी राहणार बंद

पुणे  : नव्या पिढीला मराठ्यांचे साम्राज्य, मराठी अलंकार आणि मराठ्यांचा इतिहास समजावा, त्यांनी तो मिरवावा आणि नेटाने पुढे न्यावा यासाठी शिवसृष्टीसोबत एकत्रित काम करण्याचा निर्धार सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केला. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने निर्माणाधीन असलेल्या शिवसृष्टीमधील ‘शिवस्मृती’ या दालनाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त अमृत पुरंदरे, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, श्वेता माळी व ऋतुजा माळी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

शिवस्मृती या दालनाविषयी अधिक माहिती देताना अमृत पुरंदरे म्हणाले, “शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर या ठिकाणची आठवण भेट देणाऱ्या नागरिकांकडे, पर्यटकांकडे रहावी यादृष्टीने शिवसृष्टी मध्ये एक स्मरणिका दालन असावे असे सुरुवातीपासूनच प्रतिष्ठानच्या मनात होते. ‘शिवस्मृती’ दालनाच्या निमित्ताने याला एक मूर्त स्वरूप आले असून शिवसृष्टीशी संबंधित आठवणी याद्वारे पर्यटकांना आपल्या सोबत ठेवता येतील. या दालनामध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक पुस्तके, इतर इतिहास विषयक पुस्तके, ग्रंथ, महाराजांशी संबंधित असलेल्या वस्तू, चारुहास पंडित यांची काष्ठ्य शिल्पे, लहान मुलांसाठीचे घरात खेळता येतील असे आणि बैठे खेळ, मावळासारखे कार्ड गेम्स, टी शर्टस, छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे असलेली स्टेशनरी, शिवकालीन तब्बल १०० वर्षांहून अधिक जुने असे मराठी पारंपारिक अलंकार यांचा समावेश असेल.”

शिवस्मृती दालनात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्तराज’चे मराठी अलंकार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून याविषयी बोलताना प्राजक्ता माळी म्हणाल्या, “आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेली शिवसृष्टी ही पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातून साकारत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एकाच ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आणि संकल्पनांमधून या ठिकाणी मांडला असून याद्वारे महाराजांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसृष्टी करत आहे. हा सर्व इतिहास व ‘प्राजक्तराज’ यांचेही जवळचे नाते असून आम्ही देखील १०० हून अधिक वर्ष जुने असलेले केवळ पारंपारिक मराठी अलंकार त्यांच्या मूळ स्वरूपात पुनरुज्जीवित करत आहोत. याद्वारे मराठी साम्राज्य, मराठी अलंकार आणि मराठी इतिहास पुढे नेण्यासाठी आता आम्ही शिवसृष्टीसोबत एकत्रितपणे काम करू.”

शिवसृष्टीमध्ये आम्ही ठेवत असलेले बहुतांश अलंकार हे शिवकालीन तर अनेक अलंकार हे पेशवेकालीन आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या शिवसृष्टी या आशियातील सर्वांत मोठ्या थीम पार्कमध्ये शिवकालीन दागिने असणे हे या थीमला संयुक्तिक आहे. मराठी इतिहासाप्रमाणेच आता हे अलंकार पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, त्यांनी ते परिधान करावे आणि अभिमानाने मिरवावे हाच यामागील उद्देश आहे, असेही माळी म्हणाल्या.

याबरोबरच येत्या १ नोव्हेंबर पासून शिवप्रेमींना सवलतीच्या दरात शिवसृष्टी पाहता येणार असून १ नोव्हेंबर पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतीव्यक्ती रु. १०० तर १८ वर्षांपुढील सर्वांना प्रवेशासाठी रु. २०० इतके प्रवेशशुल्क आकारण्यात येईल. या आधी शिवसृष्टीचे प्रवेश शुल्क हे रु. ६०० इतके होते, मात्र पुण्यातील अभय भुतडा फाउंडेशन यांच्या वतीने प्रतिष्ठानला देण्यात आलेल्या रु. ७५/- लाखांचा निधीमुळे मागील काही महिने यामध्ये सवलत देण्यात आली होती. आता शनिवार दि. १ नोव्हेंबर पासून प्रवेशशुल्काचे नवे दर लागू होतील याची कृपया नोंद घ्यावी, असे शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.

याबरोबरच येत्या सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी व्यवस्थापनाच्या तांत्रिक कामामुळे शिवसृष्टी बंद राहणार असल्याची माहितीही अनिल पवार यांनी दिली. ४ नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे शिवसृष्टी प्रकल्प शिवप्रेमींसाठी खुली असेल असेही पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading