Friday, April 3, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

कारीगर बाजार मध्ये देशभरातील हस्तकला व संस्कृतीचे होणार दर्शन

पुणे : देशातील कानाकोपऱ्यातील हस्तकला कामगारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा, देशभरातील संस्कृतीची रूपे एकाच छताखाली अनुभविण्याची संधी देणारा कारीगर बाजार येत्या ३१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणार आहे. क्राफ्ट अँड आर्टिझन्स रिव्हायवल एलएलपी या संस्थेच्या वतीने सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान बंड गार्डन रस्त्यावरील रेसिडेन्सी क्लबच्या समोर असलेल्या डच पॅलेस या ठिकाणी पहिल्यांदाच सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कारीगर बाजार हा केवळ एक उपक्रम नसून देशभरातील हस्तकला कलाकारांसाठी उभारलेली एक चळवळ आहे, असे सांगत कारीगर बाजारचे आयोजक म्हणाले, “देशातील कलाकारांच्या कलेचे आणि पर्यायाने त्यांचे पुनरुजीवन व्हावे, त्यांची पुसली गेलेली ओळख त्यांना पुन्हा मिळावी हा या चळवळी मागील आमचा प्रामाणिक उद्देश आहे. सदर प्रदर्शनामध्ये देशातील २६ हून अधिक राज्यातील व केंद्र शासित प्रदेशातील तब्बल १८० हून अधिक महत्त्वाचे हस्तकला कलाकार सहभागी होतील. विशेष म्हणजे या प्रदर्शनात ५० हून अधिक राष्ट्रीय व राज्य पातळीवर आपल्या कलेसाठी नावाजलेल्या पुरस्कार विजेत्या ‘मास्टर्स’ कलाकारांचा समावेश असेल.” या प्रदर्शनाद्वारे कलेचा इतिहास, कलेची आजची परिस्थिती आणि ती टिकविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न उपस्थितांना जवळून अनुभविता येतील, यापैकी अनेक कलाकार हे पहिल्यांदाच पुण्यामध्ये आपली कलाकारी प्रदर्शित करणार आहेत.

पुण्याला वारसा, बुद्धिमत्ता आणि कलेचे कौतुक करणारे शहर म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर, कारीगर बाजार केवळ एक कार्यक्रम नसून पुण्यातील नागरिक आणि भारतातील कुशल कारागीर यांच्यातील एक जिवंत संवाद असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

पामच्या पानावर पट्टचित्र रेखाटणारे ओडिसाचे गणेश साहू, बिहारमधील मधुबनी चित्रकार प्रतिमा भारती, मध्य प्रदेशातील गोंड कलाकार असलेले हिरामण उरवेती, पश्चिम बंगालचे कालीघाट चित्रकार ममोनी चित्रकार आणि गुजरातच्या कच्छ भागातील तांब्याच्या बेल बनविणारे जावेद लुहार या कलाकारांची विशेष उपस्थिती हे कारीगर बाजार चे वैशिष्ट्य असेल.

सदर प्रदर्शनामध्ये देशाच्या विविध भागातील विणकाम असलेल्या, भरतकाम केलेल्या साड्या, आदिवासी कला आणि संस्कृतीशी संबंधित अनेकविध वस्तू, शाश्वत कला आणि पर्यावरण पूरक नवोपक्रम, वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने, सजावटीचे सामान, घर सजावटीच्या वस्तू पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी उपलब्ध असतील. यासोबत संपूर्ण दिवसभर हस्तकलेचे प्रात्यक्षिक आणि बनविताना येणारी मजा देखील भेट देणाऱ्या नागरिकांना अनुभविता येईल. यामध्ये लटकन बनविण्याची, जयपुरी बांगड्या, मिर्झापूर येथील रग बनविण्याचे प्रात्यक्षिक, महाराष्ट्रातील मातीकाम आणि लाकूडकाम यांचे प्रात्यक्षिक याबरोबरच मधुबनी चित्रकला, विणकाम, ब्लॉक प्रिंटिंग, कपड्यांना पर्यावरणपूरक डाय करणे, लाखेच्या बांगड्या बनविणे अशा कार्यशाळा देखील या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतील. दुसरीकडे देशातील विविध भागातील पारंपारिक जेवणाचा आस्वाद देखील या ठिकाणी घेता येईल.

सायंकाळच्या सत्रात कारीगर बाजार पारंपारिक व समकालीन नृत्य सादरीकरणाचे कार्यक्रम होतील. यामध्ये ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान कच्छ भागातील कोक स्टुडीओ फेम मुरालाला मारवाडा यांचे काफी प्रकारातील सुफी लोकसंगीत सादर होईल. संत कबीर, संत मीराबाई आणि संत रविदास या संतांच्या रचना नव्या अंदाजात या कार्यक्रमात अनुभविता येतील. यानंतर ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान काश्मीर येथील गुलजार अहमद भट्ट व सहकलाकार हे काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध रौफ नृत्य सादर करतील. याबरोबरच ३१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान राजस्थानचे विनोद भट्ट आणि सहकारी राजस्थानचा पारंपारिक पपेट शो सादर करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading