आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाकावे, बच्चू कडू यांचा सल्ला
बुलढाणा: प्रतिनिधी
आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी स्वतः आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाकावे, असा अजब सल्ला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शेतकरी हक्क परिषदेत शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल बोलताना बच्चू कडू यांची जीभ घसरली. सरकार हे डुकरासारखे आहे. एकवेळ डुक्कर परवडले पण सरकार नाही, अशी मल्लिनाथ देखील कडू यांनी केली.
ग्रामीण भागाचे, विशेषतः शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांवर देखील त्यांनी ताशेरे ओढले. एक वेळ शहरातील आमदार परवडले. ते हप्ते गोळा करून शांत बसतात. शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही, असेही कडू म्हणाले.
शेतकरी वर्गाने विचाराची लढाई लढण्याच्या ऐवजी जातीपातीची लढाई लढायला सुरुवात केल्यामुळे या वर्गाची पीछेहाट झाल्याचे निरीक्षण करू यांनी नोंदविले. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत असेल तर त्यांनी बांगड्या भराव्यात, असेही ते म्हणाले.
घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीची लढाई लेखणीने संपवली. शेतकऱ्यांचे कैवारी शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी अडीच लाखाची नोकरी सोडून आपले आयुष्य शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले, हे देखील कडू यांनी नमूद केले.
काही काळापूर्वी सरकारच्या शेतकऱ्यांबद्दल उदासीन धोरणाच्या विरोधात नागपूर येथे आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांनी सरकारच्या शिष्टमंडळाने समजूत घातल्यावर आंदोलन मागे घेतले होते. मात्र, ऐन दिवाळीच्या दिवसात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करून बच्चू कडू यांनी सरकारच्या विरोधात पुन्हा रणशिंग फुंकल्याचे दिसते आहे.
