Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या स्वर’दरबारा’त प्रथमच निनादणार एकल हार्मोनिअमवादन

पुणे : हार्मोनिअम या वाद्याच्या माध्यमातून आणि एकल सादरीकरणातून (सोलो परफार्मन्स) हार्मनी आणि मेलडी, या दोन्ही घटकांच्या अनेकानेक सांगीतिक शक्यता रसिकांसमोर मांडण्याची अनोखी संधी पुणेकर युवा हार्मोनिअमवादक तन्मय देवचके यांना मिळाली आहे. जागतिक स्तरावर ख्याती मिळवलेल्या लंडनच्या दरबार फेस्टिव्हलच्या स्वरमंचावर या मैफिलीच्या रूपाने प्रथमच एकल हार्मोनिअमचे सूर निनादणार आहेत. दरबार फेस्टिव्हलची सुरुवात झाल्यापासून प्रथमच, हार्मोनिअम या वाद्याचे एकल सादरीकरण या स्वरमंचावर होणार आहे. लंडन येथे २६ ऑक्टोबर, २०२५ रोजी, रविवारी सायंकाळी ३.४५ वाजता तन्मय देवचके ही मैफल सादर करणार आहेत.

हार्मोनिअमवादक तन्मय देवचके हे देशातील युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आघाडीचे वादक तर आहेतच, पण एकल वादन, कंठसंगीत साथसंगतकार, नृत्य संगतकार आणि लेहेरासाथ अशा सर्वच सादरीकरणावर त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय अभिजात संगीताला समर्पित असणारा देशाबाहेरील सर्वात मोठा महोत्सव, अशी लंडनच्या दरबार फेस्टिव्हलची ओळख आहे. अशा जागतिक व्यासपीठावर, हार्मोनिअमवादनाची सोलो मैफल प्रथमच होणार आहे. दरबार फेस्टिव्हलमध्ये तन्मय यांच्या होणाऱ्या सादरीकरणाची झलक पुणेकरांना त्याआधी म्हणजेच येत्या शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी द बॉक्स २ या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता अनुभविता येईल. पुण्यातील इंडी म्युझिकॉन्स या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तन्मय यांना सोहम गोराणे (तबला), यशवंत हंपीहोली (मृदुंगम) आणि अनय लवाटे कीजवर साथसंगत करतील.

याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तन्मय देवचके म्हणाले, “यापूर्वी दरबार फेस्टिव्हलमध्ये मी अनेकदा साथसंगतकार म्हणून सहभागी झालो आहे. मात्र, सोलो वादन प्रथमच सादर करणार आहे. चार दिवसांच्या या महोत्सवात सांगतेच्या दिवशी माझे वादन होणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मी नुकताच सोलो हार्मोनिअमवादनाचा मोठा दौरा अमेरिकेत केला. दोन महिन्यांत मी अमेरिकेतील २० शहरांमध्ये एकल वादन प्रस्तुती केली. तेथील प्रतिसाद आणि रसिकांनी शेअर केलेले मनोगत, यांचा मागोवा दरबार फेस्टिव्हलच्या आयोजकांनी घेतला आणि या जागतिक स्वरमंचावर मला हार्मोनिअमवादनासाठी आमंत्रित केले आहे. माझ्यासोबत तबल्याची साथ पं. अनिंदो चटर्जी यांचे शिष्य विवेक पंड्या करणार आहेत. उस्ताद झाकीर हुसैन यांना ही सांगीतिक मानवंदना असेल.”

“हार्मोनिअम हे मूळात हार्मनीसंबंधित वाद्य मानले जाते. तर मेलडी हा भारतीय शास्त्रीय संगीताचा प्राण आहे. हार्मोनिअम या वाद्याची बलस्थाने एकल प्रस्तुतीतून रसिकांसमोर यावीत यासाठी गायकी अंग व तंतकारी अंग यांचा मिलाफ करून प्रस्तुती करण्याचे मी ठरविले आहे. मी सोलो वादन करताना शार्प टोनसाठी आणि बेस टोनसाठी, अशा दोन स्वतंत्र हार्मोनिअम वापरतो. त्यामुळे टोनल क्वालिटीमध्ये पडणारा फरक रसिकांना अनुभवता येईल. पंडीत मनोहर चिमोटे यांनी सुरू केलेल्या स्वरमंडलच्या साथीच्या प्रभावाने मी देखील त्याचा अंतर्भाव माझ्या वादनामध्ये केला आहे. हार्मोनिअम या वाद्याचा एक साधक या नात्याने, या वाद्याच्या विविध सांगीतिक शक्यता शोधणे, आपल्या प्रयोगशीलतेतून काही नव्या वाटांचा मागोवा घेणे आणि एरवी साथीचे वाद्य, अशी ओळख असलेल्या या वाद्याला मैफिलीत मध्यवर्ती स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न करणे, अशा अनेक आकांक्षा मनात बाळगून मी सादरीकरणाचा प्रयत्न करणार आहे”, असेही तन्मय यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading