Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

साडेपाचशे कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्रांचे समारंभपूर्वक वाटप

पुणे :  आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या दृष्टीने, मुळशी तालुक्यातील ५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्रांचे (एसटी) समारंभपूर्वक वाटप नुकतेच संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित समारंभात शेकडो कातकरी बांधव कुटुंबियांसह सहभागी झाले होते यावेळी हे वाटप करण्यात आले.

जनजाती कल्याण आश्रम मुळशी तसेच उपविभागीय अधिकारी मावळ – मुळशी, तहसील कार्यालय मुळशी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प – घोडेगाव, पंचायत समिती मुळशी तसेच रोहन फेडरेशन यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कातकरी बांधवांना जात प्रमाणपत्रे सुपूर्द करण्यात आली. आदिवासी क्रांतिकारक हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या ९५ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मुळशी तालुक्यातील माले येथील हुतात्मा नाग्या महादू कातकरी समाज विकास केंद्र येथे हा सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, मावळ – मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, मुळशीच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुण्याच्या जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष प्रकाश धोका, पिंपरी चिंचवडच्या जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सुरेश गुरव, मुळशीच्या जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष वसंत वाघमारे, मनोज पोचट, रोहन बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुहास लुंकड, संचालक दीपक भटेवारा, रोहनच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक अनुजा शम्स आणि पुणे जिल्हा परिषडेचे सदस्य सागर काटकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जनजाती कल्याण आश्रम, साथी अनुसंधान ट्रस्ट, डोअर स्टेप स्कूल फेडरेशन आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने मुळशी तालुक्यात सातत्याने सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, तसेच उत्तम शिक्षण घेऊन गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या, कौशल्यविकासाचे प्रशिक्षण घेऊन रोजगार निर्मिती करणाऱ्या कातकरी समाजातील विद्यार्थांचा, महिलांचा रोहन फेडरेशनच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. समाजातील पुढील पिढीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास करायचा असेल, तर आपण संघटित असले पाहिजे. आपण नेहमी एकत्र असले पाहिजे. सर्व कामे परस्पर सहकार्यातून साध्य केली पाहिजेत. विकासासाठी आपले गाव सोडून जाणे, हा मार्ग नव्हे. विकासाची कौशल्ये आत्मसात करून आपल्या गावात राहून स्वतःसह गावाच्याही विकासात योगदान देणे महत्त्वाचे आणि अगत्याचे आहे. सगळ्यांनी मिळून गाव मोठे करण्याचा प्रयत्न करायला हवा. मी स्वतः चुकीचे वागणार नाही आणि कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, असा निश्चय प्रत्येकाने करायला हवा, तरच खऱ्या अर्थाने गाव विकसित होईल”.

सुहास लुंकड यांनी रोहनच्या सीएसआर माध्यमातून मुळशी तालुक्यात कातकरी आदिवासींसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. “दस्तऐवजीकरण, शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मितीच्या संधी व कौशल्यप्रशिक्षण आणि घरबांधणी, अशा पाच टप्प्यांच्या माध्यमातून मुळशी तालुक्यात कार्य सुरू आहे. कार्याची सुरवात झाल्यापासून सुमारे २ हजार कातकरी आदिवासींना अधिकृत जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. बालवाडी, अंगणवाडीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतिगहे, शालोपयोगी साहित्य, महिलांसाठी आरोग्यसुविधा, टेलरिंग यूनिट तसेच गवंडीकाम प्रशिक्षण, असेही प्रकल्प सुरू आहेत”, असे ते म्हणाले. युवराज लांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading