इंडसइंड बँकेने राजीव आनंद यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली जाहीर
मुंबई : इंडसइंड बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आज राजीव आनंद यांची बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) म्हणून नियुक्ती जाहीर केली. ते 25 ऑगस्ट 2025 पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा कार्यभार सांभाळतील.
राजीव आनंद यांना बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील 35 वर्षांहून अधिक अनुभव असून त्यांनी या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांनी अलीकडेपर्यंत ऍक्सिस बँकेत डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिले. त्यांचा कॅपिटल मार्केट्स, ट्रेझरी आणि अॅसेट मॅनेजमेंटमध्ये विशेष अनुभव आहे आणि त्यांनी खाजगी तसेच कॉर्पोरेट बिझनेसच्या वाढीत मोलाची भूमिका बजावली आहे.
या नियुक्तीद्वारे, बँकेने योग्य कौशल्ये आणि दृढ मूल्ये असलेले एमडी आणि सीईओ तत्काळ ओळखण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर शिक्कामोर्तब केले आहे.
या नियुक्तीबाबत भाष्य करताना इंडसइंड बँकेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील मेहता म्हणाले: “संचालक मंडळाच्या वतीने, राजीव आनंद यांचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्वागत करत मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. संचालक मंडळ राजीव आणि व्यवस्थापन टीमसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे, जेणेकरून बँकेच्या वाढीला बळ मिळेल आणि उत्तम प्रशासन मानकांना प्राधान्य दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत अमूल्य पाठिंबा दिल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे मनःपूर्वक आभार मानतो. संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि सर्व कर्मचारी राजीव यांचे इंडसइंड कुटुंबात स्वागत करण्यासाठी आणि या संस्थेला तिच्या पूर्ण क्षमतेपर्यंत नेण्यासाठी सज्ज आहेत.”
