Wednesday, May 20, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

अमेरिकेच्या 250 व्या आर्मी डे परेडचे पाहुणे म्हणून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा अमेरिकेकडून मोठा सन्मान केला जात आहे. अमेरिकेच्या 250 व्या आर्मी डे परेडचे पाहुणे म्हणून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना पाचारण करण्यात आले आहे. ते तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. या कालावधीत भारत आणि पाकिस्तान मधील तणाव, अफगाणिस्तानकडून पाकिस्तानवर केले जाणारे हल्ले या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

फील्ड मार्शल मुनीर हे 12 जून रोजी अमेरिकेला रवाना होत असून 14 जून रोजी होणाऱ्या आर्मी डे परेड मध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. 

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेऊन प्रथम पाक व्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानतील दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतात हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. मात्र, पाकिस्तानी हल्ल्यांमध्ये सीमा भागातील काही निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे हवाई तळ उध्वस्त केले. 

भारताच्या लष्करी व राजनैतिक कारवायांमुळे गुडघ्यावर आलेल्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मध्यस्थीसाठी नाक घासले. मात्र भारताने त्रयस्थ देशाची मध्यस्ती नाकारली. अखेर भारत आणि पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून युद्धविरामाची घोषणा केली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचे श्रेय लाटण्यासाठी परस्पर युद्धाबंदीची घोषणा भारत आणि पाकिस्तान यांच्या आधीच समाज माध्यमातून करून टाकली. भारताने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केली नसल्याचे स्पष्ट केले. 

अमेरिकन राज्यकर्त्यांकडून एकीकडे भारताशी मैत्रीचे नाटक वठवले जात असले तरी दुसरीकडे पाकिस्तानचे चोचले पुरविण्यासाठी अमेरिकन राज्यकर्ते तत्पर आहेत. भारताने पाकिस्तानचा दहशतवादी चेहेरा जगासमोर उघड करूनही आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून पाकिस्तानला अब्जावधी डॉलरची मदत देण्यात आली. आशियाई विकास बँकेनेही त्यांना मोठ्या रकमेचे कर्ज दिले. यामागे अमेरिकेचा हात आहे. 

आता भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर देखील फील्ड मार्शल पदावर बढती घेणाऱ्या आसिम मुनीर यांना आर्मी डे परेडला पाचारण करून अमेरिकेने आपला खरा चेहरा उघड केला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading