दि विश्वेश्वर सहकारी बँक आता शेड्युल्ड बँक
पुणे : पुणे येथे सन १९७२ साली स्थापन झालेल्या दि विश्वेश्वर सहकारी बँकेला दि. २७ मे २०२५ रोजी रिझर्व्ह बँकेने ‘शेड्युल्ड’चा दर्जा देत एक ‘विश्वसनीय व जबाबदार बँकर” म्हणून प्रमाणपत्र दिले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे यांनी ही माहिती दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र मिरजे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे उपस्थित होते. विश्वेश्वर सहकारी बँक ही नागरी सहकारी बँकींग क्षेत्रात अत्यंत वेगाने प्रगती करणारी बँक ठरली आहे. प्रथम सन २०११ मध्ये कर्नाटक राज्यातील निपाणी येथील दि निपाणी अर्बन सौहार्द सहकारी बँकेचे विलनीकरण करुन घेत या बँकेने जसा मल्टी-स्टेट सहकारी बँकेचा दर्जा प्राप्त केला.
ज्या नागरी सहकारी बँकांची नेट डिमांड आणि टाईम लाएबिलिटीज म्हणजेच थोडक्यात ठेवी रुपये १ हजार कोटींपेक्षा जास्त आहेत, अशा बँका ‘शेड्युल्ड’ बँकेचा दर्जा मिळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अर्ज करु शकतात. या बँकांनी अर्ज केलाच पाहिजे असे बंधन त्यांच्यावर नाही. अर्ज केल्यानंतर रिझर्व्ह बँक त्यांच्या अनेक तपासण्यांमधून संबंधित बँकेचा आर्थिक कारभार रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार आहे का नाही? व त्यांच्या प्रगतीमध्ये सातत्य आहे का नाही ? हे तपासून त्यांना योग्य वाटल्यासच सहकारी बँकांना हा दर्जा दिला जातो.
दि विश्वेश्वर सहकारी बँकेने वर्ष २०११ मध्ये शेड्युल्ड दर्जा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर झालेल्या एकूण १५ तपासण्यांमधून विश्वेश्वर बँकेने प्रगतीमध्ये सतत सातत्य राखण्याबरोबरच रिझर्व्ह बँकेच्या कडक निकषांचे पालन करण्यामध्येही सातत्य दाखविल्यानेच बँकेस हा बहुमान मिळाला आहे.
बँकेची गेल्या तीन वर्षातील आर्थिक स्थितीची आकडेवारी पुढीलप्रमाणे –
बँकेस गेली अनेक वर्षे लेखापरिक्षणात ‘अ’ वर्ग प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे बँकेने सातत्याने RBI चे “Financially Sound and Well Managed” (FSWM) च्या सर्व निकषांचे पालन केले आहे.
कायद्याच्या भाषेत बोलायचे झाल्यास, उत्तम कामगिरी करणाऱ्या मोठ्य नागरी सहकारी बँकांना, केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९३४ च्या दुसऱ्या परिपत्रकात (II nd Scheduled) समावेश केला जातो. यामुळे जशी बँकांची प्रतिमा सुधारते तसेच या बँकांना इतर नागरी सहकारी बँकांपेक्षा व्यवसायाच्या संधी जास्त मिळतात तसेच त्यांच्या इतर नागरी सहकारी बँकांपेक्षा बंधनेही जास्त असतात. या बँकांना व्यापारी बँकांकरीता केलेले सर्व नियम पाळावे लागतात.
या बँकांना व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध होतात.
1. रिझर्व्ह बँकेकडून रिफायनान्सची सवलत मिळते.
2. शेड्युल्ड बँकांच्या बँक गॅरंटीज सहकारी संस्था, कंपन्या, सरकारी आणि निमसरकारी कंपन्या इ. स्विकारतात. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य होईल.
3. रेमिटन्सच्या सवलती अंतर्गत रिझर्व्ह बँक व स्टेट बँक यांच्या शाखांतर्गत टेलिग्राफिक ट्रान्सफर, मनी ट्रान्सफर इत्यादी सवलती बरोबरच त्यांच्या शाखांवर डिमांड ड्राफ्टही काढता येतो.
4. नगरपालिका, निमसरकारी संस्था, धर्मदाय संस्था यांच्याकडून ठेवी स्विकारता येतात व राज्य शासनांचे ‘नेटवर्थ’ च्या संदर्भातील निकषांचे पालन केल्यास शासकीय व्यवहारही स्वःतातर्फे राबविता येतात.
5. Hire Purchase ची कर्जे करता येतात.
6. परदेशी बँकाबरोबर सामंजस्य करार करुन, आयात निर्यातीचे व्यवहार आपल्या खातेदारांसाठी सुरु करता येतात.
7. Letter of Credit, On line Banking, Mobile Banking यासारख्या सुविधा ग्राहकांना पुरविता येतात.
8. भांडवल वृध्दीसाठी Tire-II मधील दिर्घ मुदतीच्या ठेवी जश्या घेतात तसेच दिर्घ मुदतीचे बॉण्डस देखील वितरीत करता येतात.
9. मर्चेंट बँकींगचे व्यवहार ग्राहकांच्या वतीने करता येतात.
10. राष्ट्रीयकृत बँकांच्या बरोबरीने आपल्या ग्राहकांसाठी ‘बँक गॅरंटीज’ देता येतात.
11. बांधकाम व्यवसायीकांची ‘RERA’ खाती उघडून घेता येतात.
वरील महत्वाच्या सवलतींबरोबरच शेड्युल्ड बँकेची सर्व रोख तरलता (CRR) रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो. दर आठवड्याला विहीत नमुन्यात असंख्य माहिती द्यावी लागते. यासारखी बंधने देखील पाळावी लागतात.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै. नामदेवराव रुकारी, कै. भरतशेठ गाडवे, कै. बाबूराव हरपळे-पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विश्वेश्वर बँकेची स्थापना दि. ७ नोव्हेंबर १९७२ ला दिवाळी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर गणेश पेठ येथे पहिल्या शाखेपासून केली. बँकेचा कार्यक्षेत्राचा विस्तार महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आहे. बँकेच्या ३० शाखांच्या माध्यमातून गेली पाच दशके निरंतर ग्राहक सेवा देत आहोत
सध्या रिझर्व्ह बँकेने देशातील नागरी सहकारी बँकांची चार वर्गात विभागणी केली आहे. त्यामध्ये ₹१०० कोटींच्या आतील ठेवी असणाऱ्या बँका, ₹१०० ते १००० कोटी, ₹१००० ते १०,००० कोटी व ₹१०,००० कोटींच्या वरील बँका असे वर्गीकरण आहे.
₹१०,००० कोटींच्यावर ठेवी असणाऱ्या सध्या भारतात केवळ ७ बँका असून, या सर्व महाराष्ट्रातच आहेत.
दि विश्वेश्वर सहकारी बँक आज आपल्या ₹ २२०० ठेवींसह (दि. ३१ मे २०२५ अखेर) तिसऱ्या प्रवर्गात असून, दि. ३१ मार्च २०२६ अखेर ₹ २५०० ठेवींचे बँकेचे उद्दिष्ट असून, पुढील ४ वर्षात ₹१०,००० कोटींच्यावर ठेवी असणाऱ्या भारतातील नागरी बँकांमध्ये स्थान मिळविण्याचा संकल्प, बँकेच्या संचालक मंडळ, सभासद, सेवक व हितचिंतकांनी सोडला आहे.
