‘निसर्गछाया उपक्रमात अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे’; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे – “समाज म्हणून प्रत्येक समाजघटकाचे स्वतःचे असे योगदान असते. त्यात समाजातील तरुणाई जशी भूमिका बजावते, तशीच मोलाची भूमिका ज्येष्ठ नागरीक आणि विद्यार्थीही निभावत असतात. ‘निसर्गछाया’ च्या निमित्ताने समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. या उपक्रमांतर्गत इतरही अनेक उपक्रम यशस्वीपणे सुरू आहेत. त्या उपक्रमांत नागरिकांनी सहभागी व्हावे. स्वतः आनंद तर मिळवावाच, पण अप्रत्यक्षपणे इतरांना आनंदी करण्यातही योगदान द्यावे”, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच निसर्गछाया उपक्रमाचे मार्गदर्शक चंद्रकांत पाटील यांनी केले.
‘देवगांवकर फाऊंडेशन‘ तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असलेल्या व चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या ‘निसर्गछाया’ या प्रकल्पाच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळावा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न झाला. मेळाव्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश होता.
यावेळी निसर्गछाया प्रकल्पाच्या संचालिका अमृता देवगांवकर, देवगांवकर फाऊंडेशनचे मंदार देवगावकर, प्रसिद्ध एकपात्री हास्यकलाकार मकरंद टिल्लू आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मेळाव्याची संकल्पना अमृता व देवगांवकर फाऊंडेशनचे संचालक मंदार देवगांवकर यांची असून नवचैतन्य हास्य क्लबचे सहकार्य देखील या मेळाव्यास लाभले होते. निसर्गछाया या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातील नागरिकांच्या सहभागाने १० हजारांचा सहभाग नोंदवल्यानिमित्त, ज्येष्ठ नागरिकांच्या या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गछायाच्या मासिक अंकाचे प्रकाशन देखील यावेळी संपन्न झाले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “अशा प्रकारचे एकूण २२ प्रकल्प सध्या विविध ठिकाणी सुरू आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यातील ७ प्रकल्पांचे सादरीकरण केले जावे, असे मी सुचवले होते. निसर्गछाया प्रकल्पाचे आजचे सादरीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांची विक्रमी उपस्थिती पाहता, प्रकल्प यशस्वी झाल्याची ग्वाही मिळते आहे. प्रकल्पांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारची पॅकेजेस असून, मोठ्या संख्येने त्यांचा लाभ ज्येष्ठ नागरीक घेत आहेत, याचा आनंद आहे.” निसर्गछाया प्रकल्पाची क्षमता लवकरच वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक संख्येने नागरिक लाभार्थी ठरतील. फिरती ग्रंथालये, मानसी, बचतगटांसाठी व्यासपीठ, झोपडपट्टीतील युवती व महिलांसाठी उपक्रम या सर्वांना नागरिकांकडून उत्साही प्रतिसाद मिळत असल्याचे पाटील म्हणाले.
अमेरिकेतून भारतात परतल्यावर कौटुंबिक व्यवसाय सांभाळत असतानाही समाजाचे देणे आपल्यावर आहे, ही भावना सतत मनात होती. त्यातूनच चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गछाया हा उपक्रम सुरू झाला आणि आज त्याचे व्यापक स्वरूप आपण पाहतो आहोत. यापुढेही असे उपक्रम सातत्याने होतील असा विश्वास अमृता देवगांवकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.
मंदार देवगांवकर म्हणाले, “निसर्गछाया उपक्रमाचे १० हजारावे बुकिंग आणि चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस, असे दुहेरी औचित्य साधून या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्यात मनोरंजनाच्या जोडीने ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त असे अनेक घटक जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा”.
कार्यक्रमाची सुरुवात करण देवगांवकर यांच्या गणेश वंदनेने झाली. वाढदिवसानिमित्त चंद्रकात पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी अंजली पाटील यांचे निसर्गछाया परिवारातर्फे औक्षण करण्यात आले. निसर्गछाया प्रकल्पाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे चंद्रकांत पाटील यांना स्वच्छ पुणे सुंदर पुणे हसरे पुणे, या उपक्रमाचा फ्लेक्स भेट देण्यात आला. डॉ. गार्गी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
या एक दिवसीय मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त वस्तू व आवश्यक सेवांचे प्रदर्शन, हास्य योग, गायक ऋषिकेश रानडे, जितेंद्र अभ्यंकर आणि गायिका स्वप्नजा लेले यांच्या गाण्यांची मैफल यांचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये आरोग्यसेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक योजना, आवश्यक अन्न उत्पादनांचे सेवा स्टॉल, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सहली यांची माहिती देणारे स्टॉलही होते.
