पुणे जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान !! विजेतेपद मुंबई संघाकडे !!
पुणे : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्युआयएफए) यांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा’ सब-ज्युनिअर मुलींच्या गटाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई जिल्हा संघाने पुणे जिल्हा संघाचा टायबे्रकमध्ये ४-२ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. पुणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथे झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा ठरला. सामन्याच्या १९ व्या मिनिटाला सानवी चौरे हिने गोल करून मुंबई संघाचे खाते उघडले. ०-१ अशा पिछाडीवरून पुणे संघाने सुरेख खेळ केला. २५ व्या मिनिटाला थिआ फर्नांडिस हिने गोल करून पुणे संघाला १-१ अशी बरोबरी निर्माण करून दिली. पुर्वार्धामध्ये १-१ अशी बरोबरी कायम राहीला. उत्तरार्धात ५८ मिनिटाला आदीत्री राजपुत हिने गोल करून पुणे संघाला २-१ अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोनच मिनिटांंनी मुंबईच्या शर्वरी ढेरे हिने गोल करून २-२ अशी बरोबरी निर्माण करून दिली. पूर्ण वेळ ही बरोबरीची कोंडी कायम राहीली आणि सामन्यामध्ये टायब्रेक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
टायब्रेकमध्ये पुणे संघाकडून कोणताही खेळाडू गोल करू शकला नाही. पुणे संघाच्या जेनी राज, मिष्का अरूण, आध्या अगरवाल आणि थिआ फर्नांडिस यांना गोल करण्यात अपयश आले. मुंबई संघाकडून प्रिशा पटेल आणि सानवी चौरे यांनी गोल करून संघाचे विजेतेपद निश्चित केले. पेनल्टी शुटमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने पुणे जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
याआधी अंतिम सामन्यापर्यंत वाटचाल करताना पुणे संघाने उपांत्य फेरीमध्ये पालघर संघाचा ७-० असा तर, उपांत्यपुर्व फेरीमध्ये रायगड संघाचा ४-० असा पराभव केला होता. पुण्यासह रायगड, कोल्हापुर, पालघर, मुंबई, नाशिक, नागपुर, रायगड आणि सातारा या संघांनी उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला होता.
अंतिम सामन्याचा सविस्तर निकालः मुंबई जिल्हा संघः ४ (सानवी चौरे १९ मि., शर्वरी ढेरे ६० मि., प्रिशा पटेल, सानवी चौरे); (गोल चुकविलेः काम्या हैदणकर) टायब्रेकमध्ये वि.वि. पुणे जिल्हा संघः २ (थिआ फर्नांडिस २५ मि., अदीत्री राजपुत ५८ मि.); (गोल चुकविलेः जेनी राज, मिष्का अरूण, आध्या अगरवाल, थिआ फर्नांडिस); पुर्वार्धः १-१; पूर्ण वेळः २-२; टायबे्रेकः २-०;
