Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट अंतर्गत २४ व २५ मे रोजी कार्यक्रम

पुणे : नवोदित तरुण नर्तकांना व नृत्य दिग्दर्शकांना आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांसह प्रयोग करण्यासाठी, सर्जनशीलतेच्या सीमा ओलांडत काही नवीन सादरीकरण करण्यासाठी याबरोबरच पारंपारिक म्हणींच्या दृष्टिकोनातून आपला स्वत:चा असा वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने ज्येष्ठ कथक गुरु शमा भाटे यांच्या नाद-रूप कथक संस्थेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट अंतर्गत शनिवार दि. २४ व रविवार दि. २५ मे रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह या ठिकाणी दोन्ही दिवशी सायं ५.३० नंतर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. महराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनास्थित माधव व रमा मांजरेकर यांच्या तौर्य या संस्थेची मदतही कार्यक्रमास लाभली आहे.

२०१८ सालापासून एक अभिनय प्रयोग म्हणून मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंटचे आयोजन नाद- रूप च्या वतीने करण्यात येत असल्याचे सांगत गुरु शमा भाटे म्हणाल्या, “पारंपारिक नृत्यप्रकारात अभिनव विचार मांडण्याची ही संधी याद्वारे नृत्य दिग्दर्शकांना मिळत असते. सादरीकरणानंतर या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आपले विचार या नृत्य दिग्दर्शकांना सांगत परीक्षण करतात जेणेकरून कलाकारांना योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये अभिषेक धावडे, जुई देशिंगकर, इशा काठवते, विद्या धिडे यांसोबतच आणि प्रचिती भावे व श्रद्धा मुखडे हे त्यांनी दिग्दर्शित केलेली सादरीकरणे उपस्थितांसमोर प्रस्तुत करतील.”

सदर सादरीकरणांचे परीक्षण कवयित्री व लेखिका असलेल्या नंदिता वागळे, प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, नृत्यदिग्दर्शक व आपल्या लाईट्स, नेपथ्य आणि स्टेज व्यवस्थेसाठी प्रसिध्द असलेले सुशांत जाधव, नाट्य कलाकार राधिका इंगळे- काकतकर आणि आदिती मंगलदास या करणार असल्याची माहितीही भाटे यांनी दिली. आदिती मंगलदास या ज्येष्ठ नृत्यांगना व जगप्रसिद्ध नृत्य-संरचनाकार असून यांचे विशेष व्याख्यान देखिल यावेळी संपन्न होईल. आपला नाविन्यपूर्ण नृत्यप्रवास या विषयावर त्या उपस्थितांशी संवाद साधतील.

Leave a Reply