Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांची शिवसृष्टीला भेट

पुणे  : स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि रोमांचकारी शिवकाळाची अनुभूती थेट २१ व्या शतकात करून देणाऱ्या आंबेगाव ब्रुद्रुक येथील शिवसृष्टी प्रकल्पाला राज्यातील विविध प्रशासकीय अधिकारी आणि नेत्यांनी नुकतीच भेट दिली. यामध्ये मुंबई येथील राजभवनचे सहसंचालक विकास कुलकर्णी, मंत्रालयाच्या नियोजन विभागाचे सहसंचालक (शाश्वत विकास ध्येय) हंसध्वज सोनावणे, नाशिकच्या आदिवासी विकास विभागाचे सहसंचालक किरण जोशी या अधिकाऱ्यांसोबत छत्तीसगडचे कृषी मंत्री रामविचार नेताम, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुगजी, मध्यप्रदेश सरकारचे माजी मंत्री आणि भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्या माजी खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष भूषण कांबळे यांचा समावेश होता.

कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि महाराजा छत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने निर्माण करण्यात येत असलेल्या शिवसृष्टीमधील प्रत्येक विभाग हा इतिहासाची आठवण करून देणारा होता अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, प्रकल्प व्यवस्थापक प्रमोद साळुंखे, अभियंते विलास कोळी यावेळी उपस्थित होते. पवार यांनी यावेळी शिंदेशाही पगडी आणि कवड्यांची माळ देत अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

या सर्व अधिकारी व नेत्यांनी यावेळी शिवसृष्टीमधील दुर्गवैभव’, ‘रणांगण’, महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार उभा करणारे दालन, प्रत्यक्ष शिवराय आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव देणारे श्रीमंत योगी हे दालन, राज्याभिषेकाचा देखावा असलेला ‘सिंहासनाधिश्वर’ हे दालन यांना भेट दिली. याबरोबरच शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्य आकर्षण असलेले टाइम मशीन थिएटर आणि महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या प्रिंट्सही या सर्वांनी पाहिल्या. प्रतापगडावरील तुळजा भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती आणि गंगासागर तलाव याला देखील सर्वांनी भेट दिली.

आपल्या भावना व्यक्त करताना हंसध्वज सोनावणे म्हणाले, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा कालखंड, त्यांचा संघर्ष, जनतेप्रती त्यांचे असलेले प्रेम या वास्तव दर्शन या प्रकल्पाच्या निमित्ताने झाले. शिवसृष्टी पाहून आम्ही थक्क झालो आहोत.” शिवसृष्टीचा अनुभव अतिशय प्रेरक व आनंददायी होता. महाराजांची स्वराज्य, स्वभाषा आणी स्वधर्म ही त्रिसूत्री आजच्या काळात किती अत्यावश्यक आहे याची जाणीव झाली. महाराजांचे आदर्शव्रत जीवन या निमित्ताने आम्ही अनुभविले असे विकास कुलकर्णी म्हणाले. या प्रकल्पाची भव्यता पाहून रोमांचित झालो असून या एकात्मेवात द्वितीय अशा प्रक्ल्पाला भेट दिल्याचा आनंद किरण जोशी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading