Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

कृष्णरंगात रंगले रसिक

 

पुणे : ‌‘कृष्णरंग अधरी धरुनी वेणू‌’ या सांगीतिक कार्यक्रमात कृष्णाच्या अद्भुत लीला दर्शविणाऱ्या भक्तीरचनांमधून रसिक कृष्णरंगात रंगले.
निमित्त होते अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणेतर्फे आयोजित ज्ञानदेव संगीत महोत्सवाचे. पुणे विद्यार्थी गृहाच्या कुलगुरू दादासाहेब केतकर सभागृहात हा महोत्सव रंगला.
पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्या संकल्पनेतून आणि संगीत मार्गदर्शनातून साकारलेल्या ‌‘कृष्णरंग अधरी धरुनी वेणू‌’ या कार्यक्रमात संत एकनाथ महाराज, संत सूरदास, संत नामदेव महाराज यांनी रचलेल्या कृष्ण भक्तीपर रचना आणि गौळणी सादर करण्यात आल्या. अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर, सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर यांनी भक्तीरचना सादर केल्या.
‌‘कृष्णराधे राधेराधे‌’च्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. कृष्णाच्या बालक्रीडेचे वर्णन करणाऱ्या संत एकनाथ महाराज यांच्या ‌‘माझा कृष्ण देखीला का‌’ या रचनेनंतर छोट्या कृष्णाने आईकडे केलेली लडीवाळ तक्रार सादर करताना संत सूरदास रचित ‌‘खेलने ना जाऊ मैया, गोपिया खिजावे मोहे‌’ ही अनोखी रचना सादर करण्यात आली. कृष्णाच्या बासरीचे म्हणजेच वेणूच्या निर्मितीचे महत्व सांगत नाथ महाराजांच्या ‌‘अधरी धरुनी वेणू‌’ या रचनेतील आर्त स्वराने रसिक भक्तीरसात तल्लीन झाले. संत नामदेव महाराज रचित पाच भाषांमधील ‌‘गौळणी ठकविल्या‌’ ऐकविताना भक्तीला धर्म, जात, भाषेचे बंधन नसते हे दर्शविले गेले. कृष्णाचे गोपिकांशी असलेले वैश्विक नाते उलगडणारी ‌‘आहारे सावळीया‌’ ही रचना उपस्थितांना विशेष भावली. विविध ताल, सूर आणि रागांचा मिलाफ साधणारा ‌‘जो जो रे मधुसूदना‌’ हा पाळणा सादर करून ‌‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा‌’ ही गौळण सादर करण्यात आली. अजिंक्य जोशी (तबला), अमर ओक (बासरी), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड), पार्थ भूमकर (पखवाज), विश्वास कळमकर (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. निरुपण कीर्तनकार श्रेयस बडवे यांनी रसाळ वाणीत केले.

तत्पूर्वी सुप्रसिद्ध तबलावादक यशवंत वैष्णव यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी वादनाची सुरुवात तीन तालाने केली. उस्ताद झाकीर हुसेन यांनी रचलेला बायाप्रधान कायदा, अल्लारखा खाँ यांचे छंदविचार दर्शविणारे सादरीकरण प्रभावी ठरले. लखनऊ घराण्याशी नाते सांगणारा रेला, दिल्ली घराण्याचा कायदा, पारंपरिक रचना, बंदिशी, चक्रदार तोडा यांचे प्रभावी सादरीकरण रसिकांना विशेष भावले. मिलिंद कुलकर्णी यांनी लहेरा साथ केली.

पंडित रघुनाथ खंडाळकर यांचे शिष्य महेश कंटे व शंकर गिरी यांचे दमदार गायन झाले. मैफलीची सुरुवात पूरिया धनाश्री रागातील विलंबित एकतालातील ‌‘बल बल जाऊं‌’ या बंदिशीने करण्यात आली. त्यानंतर द्रुत तीन तालातील ‌‘पायलिया झनकार‌’ ही रचना सादर केली. संत तुकाराम महाराज रचलेली आणि पंडित खंडाळकर यांनी संगीतबद्ध केलेली ‌‘आम्ही नामाचे धारक‌’ ही भक्तीरचना प्रभावी ठरली. ‌‘जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा‌’ या गजराला रसिकांनीही नामघोष करत दाद दिली. खुला सुमधुर, आवाज, सुरेल ताना ऐकताना शिष्यांवर असलेल्या गुरुकृपेची अनुभूती आली. चैतन्य पवार (तबला), ऋषिकेश पुजारी (संवादिनी), अनिल भुजबळ (तालवाद्य), दिगंबर अस्मार, भैरवी डेरे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

कै. विप्रदास चंद्रकांत मेणकर स्मृती पुरस्काराने पद्मश्री पंडित विजय घाटे यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध उद्योजक विलास जावडेकर यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध वैद्य प्रशांत सुरू, सुप्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित रघुनाथ खंडाळकर, सोमनाथ सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading