Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

२६ एप्रिल रोजी पं. आप्पासाहेब जळगांवकर जन्मशताब्दी संगीत समारोहचे आयोजन

पुणे  : संवादिनी वादन सुसंवादी असणे म्हणजे काय याचा परिपाठ घालून देणारे आणि आपल्या प्रतिभेने संवादिनी वादनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कलाकार म्हणजे पं. आप्पासाहेब जळगांवकर. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत पुण्यातील हनुमंत फडतरे (तबला) व सुरेश फडतरे (संवादिनी) या फडतरे बंधूंनी येत्या शनिवार दि. २६ एप्रिल रोजी पं. आप्पासाहेब जळगांवकर जन्मशताब्दी संगीत समारोहचे आयोजन केले आहे. एसएनडीटी येथील पीजीएसआर सभागृह क्रमांक ३, तिसरा मजला येथे सायंकाळी ५ वाजल्यापासून सदर समारोह सुरु होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

सदर समारोह हा तीन सत्रांमध्ये संपन्न होणार असून सुरुवातीला हुबळी येथी शास्त्रीय गायिका शुभांगी जाधव यांचे गायन होईल. यानंतर सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक पं अतुलकुमार उपाध्ये यांचे शिष्य व सुपुत्र राजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन रंगेल. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात ‘औडव औडव’ हा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये पाच सुरांच्या रागांची मैफल रसिकांना अनुभविता येणार आहे. पंडिता माणिका भिडे यांच्या शिष्या असलेल्या संध्या देशमुख, प्रीती तळवलकर आणि प्राची कर्णिक यांचा यामध्ये सहभाग असेल. सदर कार्यक्रमाची संकल्पना ही माया धर्माधिकारी यांची आहे.

संपूर्ण समारोहासाठी अरुण गवई, हनुमंत फडतरे, सिद्धीविनायक पैठणकर, ताराशिष बक्षी हे तबलासाथ करतील तर सुरेश फडतरे व गीतराम दराडे हे संवादिनी साथ करणार आहेत. कार्यक्रमासाठी सर्व्हेश इव्हेंट्स यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading