Sunday, May 31, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

राम नगरकर कलागौरव पुरस्कार अभिनेते संदीप पाठक यांना जाहीर

पुणे  : ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांना जाहीर झाला असल्याची घोषणा राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ वैजयंती वंदन नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर यांनी केली.

राम नगरकर कलागौरव पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते सोमवार दि. १४ एप्रिल रोजी नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी सायं ५.३० वाजता संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात तो प्रदान करण्यात येईल. रुपये अकरा हजार, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.

या आधी विनोदी अभिनेते भाऊ कदम, निलेश साबळे, समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार या मान्यवर कलाकारांना राम नगरकर कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती डॉ वैजयंती वंदन नगरकर यांनी दिली.

पुरस्काराविषयी अधिक माहिती देताना समीर बेलवलकर म्हणाले, “राम नगरकर यांनी एकपात्री अभिनयाची सुरु केलेली परंपरा संदीप पाठक हे आपल्या ‘व-हाड निघालय लंडनला’ या नाटक कलाकृतीद्वारे यशस्वीपणे पुढे नेत आहेत, म्हणून या वर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार संदीप पाठक यांना जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.”

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात संदीप पाठक यांना राम नगरकर कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात येईल. त्यानंतर उत्तरार्धात सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे पाठक यांची प्रकट मुलाखत घेतील. या दरम्यान संदीप पाठक ‘व-हाड निघालय लंडनला’ या नाटकातील काही भाग सादर करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading