आयआयटीच्या धर्तीवर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये चेअर प्रोफेसरशिप संकल्पनेला सुरुवात
पुणे : मागील १७० वर्षे अभियांत्रिकीचे उत्तम दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता आणखी वाढविण्याच्या हेतूने आयआयटीच्या धर्तीवर चेअर प्रोफेसरशिप ही संकल्पना हाती घेण्यात आली असल्याची घोषणा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी केली. सीईओपीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत असून गेल्या काही वर्षांत विद्यापीठात होत असलेल्या सकारात्मक बदलांचा एक भाग म्हणून येत्या शैक्षणिक वर्षात डॉ. प्रमोद चौधरी चेअर प्रोफेसरशिप फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड मशीन लर्निंग अँड रिलेटेड एरीयाज या चेअर प्रोफेसरशिपला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या मुख्य इमारतीमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत सदर घोषणा करण्यात आली.
यावेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि भारताचे इथेनॉल मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांच्यात एक सामंजस्य करार देखील करण्यात आला. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे, विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्या ए. डी. ठुबे, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाचे डॉ. विनोद मोहितकर, विद्यापीठाच्या संशोधन, इनोव्हेशन आणि इंडस्ट्रियल लिंकेज (आरआयआयएल)चे संचालक डॉ. नरेंद्र ढोके, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे प्रमुख डॉ. पराग सदगीर, विद्यापीठाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप देशमुख, विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. प्रशांत बारटक्के, प्राज इंडस्ट्रीजचे डी. व्ही. निंबोलकर आदी यावेळी उपस्थित होते.
या चेअर प्रोफेसरशिप बद्दल माहिती देताना डॉ. सुनील भिरूड म्हणाले, “सीओईपीच्या इतिहासात डॉ. प्रमोद चौधरी यांच्या सहकार्याने पहिल्यांदाच आयआयटीच्या धर्तीवर असा उपक्रम सुरु करण्यात येत असून यासाठी डॉ. प्रमोद चौधरी यांनी या चेअर प्रोफेसरशिपसाठी रुपये १ कोटी इतकी देणगी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला दिली आहे. दरवर्षी या देणगीच्या व्याजातून मिळणाऱ्या निधीचा वापर हा सीओईपीच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजेंस व मशीन लर्निंग (एआयएमएल) क्षेत्रातील आधुनिक शिक्षण देण्यासाठी जगभरातील उत्तम प्रोफेसर / प्रशिक्षक आणण्यासाठी करण्यात येईल. एआयएमएल हे क्षेत्र खूप वेगाने विकसित होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी ते खूप फायदेशीर ठरेल असा आमचा विश्वास आहे.”
डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “सीओईपीमध्ये अशा प्रकारची चेअर प्रोफेसरशिप सुरू करण्याचा प्रणेता असल्याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की यामुळे इतर अनेकांना पुढे येऊन सीओईपीला अशाच प्रकारे मदत करण्यास प्रोत्साहन मिळेल. आयआयटी बॉम्बे येथे ग्रीन केमिस्ट्री आणि इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजीसाठी चेअर प्रोफेसरशिप सुरू करण्याच्या माझ्या अशाच प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसून आले. सीओईपीमध्येही असेच सकारात्मक परिणाम दिसतील याची मला खात्री आहे.”
