Sunday, May 31, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील विद्यार्थ्यांनी भूतानमध्ये साजरा केला जागतिक वन दिवस

भूतान / पुणे : जगभरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नागरीकरणामुळे व इतर अनेक कारणांमुळे  जंगलांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत असल्याने विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याविषयी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून श्री बालाजी विद्यापीठ, पुणे या विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉ व लिबरल आर्टसच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ७० टक्क्यांहून अधिक भाग जंगल असणाऱ्या भूतान या देशाला भेट देवून तेथे जगलांना असलेले सांस्कृतिक व अध्यात्मिक महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत जागतिक वन दिवस साजरा केला. संयुक्त राष्ट्र संघातर्फे जागतिक वन दिवस हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो.

याविषयी माहिती देतांना स्कूल ऑफ लिबरल आर्टसच्या प्राचार्या डॉ. प्रीती जोशी म्हणाल्या, “रॉयल युनिव्हर्सिटी ऑफ भूतानच्या अखत्यारीत असलेल्या शेरुबत्से कॉलेजच्या सहकार्याने भूतान मधील जैवविविधता व स्थानिक संस्कृतीत जंगलांना असलेले महत्व विषद करणारी एक कार्यशाळा आम्ही विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली. या कार्यशाळेत भूतान येथील जैवविविधता, प्राच्य संस्कृती व कार्बन निगेटिव्ह वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले शिष्टाचार याविषयी विद्याथ्यांना अवगत करण्यात आले. शेरुबत्से कॉलेज हे भूतानमधील पहिले मान्यताप्राप्त महाविद्यालय असून ते पूर्व भूतान मधील कांगलुंग या गावात आहे. रॉयल युनिव्हर्सिटी ऑफ भूतानची निर्मिती होण्याआधी हे महाविद्यालय दिल्ली विद्यापीठाशी संलग्न होते.”

अभ्यासक्रमाबरोबरच कांगलुंग जवळ असलेल्या साकतेंग अभयारण्याला भेट देवून तेथील मेराक याठिकाणच्या स्थानिक आदिवासींशी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून येथील जैवविविधतेचा व संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला. भूतान हा जगातील कदाचित एकमेव कार्बन-निगेटिव्ह देश आहे. याचा अर्थ देशाच्या क्रियाकलापांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइड पेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड तेथील जंगले शोषून घेतात. हे म्हणजे नेमके काय? याचे उत्तर तरुण विद्यार्थ्यांना स्वानुभवातून मिळावे, त्यांना जंगलांचे महत्व कळावे व पुढे जावून त्यांनी वनसंवर्धन क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रेरणा घ्यावी हाच या उपक्रमामागील हेतू आहे असे डॉ. जोशी यांनी सांगितले. जवळच असलेल्या शेत्येमा नावाच्या खेड्याला भेट देवून स्थानिक कला संस्कृतीचा अनुभव देखील यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.

भूतान देशाचे माजी गृह व सांस्कृतिक मंत्री मिंजूर दोरजी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, भूतानमध्ये पर्यावरण आणि संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन,  सुशासन आणि सामाजिक आर्थिक विकास यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. यामुळे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस अर्थात नागरिकांनी आनंदी असणे यात आम्हाला उच्च पातळी गाठता आली आहे. आम्ही वनांनी वेढलेल्या पर्वतांना देवता मानतो. भूतानमध्ये असे बरेच असे पर्वत आहेत जे आम्ही जाणूनबुजून पर्वतारोहणासाठी खुले करत नाही जेणेकरून तेथील नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधता टिकून राहील.”

शेरुबत्से कॉलेजचे अध्यक्ष त्शेरिंग वांगडी, रॉयल युनिव्हर्सिटी ऑफ भूतानच्या गेडू कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीजचे संचालक डॉ लाहतो जांबा , श्री बालाजी विद्यापीठ पुणेच्या डॉ आशा कारभार व आशिष कसबे वर नमूद कार्यशाळेच्या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading