लैंगिकता समाजातील मूल्यव्यवस्थेशी जोडल्याने टॅब्यू – डॉ. सबिहा इनामदार
पुणे : “आपल्या समाजजीवनामध्ये लैंगिकता (सेक्स) हा घटक मूल्यव्यवस्थेशी जोडला गेल्याने अतिशय नैसर्गिक अशा या भावनेभोवती अनेक टॅब्यू निर्माण झाले आहेत. त्यामुळे सेक्स ही अत्यंत नैसर्गिक गरज असूनही विशेषतः स्त्रिया आपल्या लैंगिक गरजा, लैंगिक सुखाच्या संकल्पना, अपेक्षा, आवडीनिवडी याविषयी आपल्या जोडीदारासोबत मोकळा संवाद साधत नाहीत. हे टॅब्यू झटकून, स्त्रियांनी मोकळेपणाने सेक्स या विषयावर संवाद साधला पाहिजे”, असे प्रतिपादन सेक्स आणि रिलेशनशिप तज्ज्ञ डॉ. सबिहा इनामदार यांनी शनिवारी येथे केले.
पुण्यातील ‘पी.एम शहा फाऊंडेशन’ आणि ‘वर्धमान प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधत ‘चाळीशीनंतरचे महिलांचे कामजीवन व हार्मोनल बदल’ या विषयावर सेक्स आणि रिलेशनशिप तज्ज्ञ डॉ. सबिहा इनामदार यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवारी १५ मार्च रोजी लॉ कॉलेज रस्त्यावरील एनएफडीसी – राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे दुपारी ३:३० वाजता हे व्याख्यान संपन्न झाले. महिलांनी या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद तर दिलाच, पण डॉ. सबिहा यांच्या संवाद साधण्याच्या हलक्याफुलक्या शैलीलाही मनमोकळी दाद दिली.
प्रास्ताविक करताना पी. एम. शहा फाउंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी म्हणाले, ” चाळीशीनंतर महिलांचे कामजीवन केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक व भावनिक समाधानावर देखील अवलंबून असते. या टप्प्यावर लैंगिक आयुष्य अधिक समृद्ध होऊ शकते. त्यासाठीच या नाजुक पण महत्त्वाच्या विषयावर हे व्याख्यान आयोजित केले आहे’.
डॉ सबिहा इनामदार म्हणाल्या, “लैंगिक सुखाचा, त्यातील परमोच्च आनंदाचा अधिकार स्त्रीपुरुष दोघांनाही आहे. पण, आपल्याकडे स्वतःच्या लैंगिक सुखाबाबत, तृप्तीबाबत, गरजा, अपेक्षा, आवडी, याविषयी स्त्रिया आपल्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधत नाहीत. अनेकदा स्त्रीला देखिल सेक्समध्ये बरोबरीचे स्थान असते, हेही स्त्रियांना माहिती नसते. आपल्या शरीराची, शारीरिक गरजांची स्त्रियांना जाणीवच नसते. त्यामुळे विशेषतः चाळीशी उलटल्यावर जेव्हा मासिक पाळीचे प्रश्न, मेनोपॉज, हार्मोनल बदल, मूड्स सतत बदलत राहणे, योनीमधील कोरडेपणाची समस्या..याबद्दल पुरेशी जाणीव जोडीदारांनाही नसते. इतक्या वर्षांच्या सवयीनंतर नात्यातील नवेपणा संपलेला असतो. तोचतोपणा वाढलेला असतो. जोडीदाराच्या सर्व सवयी, आवडी माहिती झालेल्या असतात. शिवाय बाह्य स्पर्धात्मक जग, गतीमान जगणे, ईगो समस्या, संघर्ष..यांचाही परिणाम लैंगिक जीवनावर होत असतो. पण याविषयी मोकळेपणाने संवाद साधला न गेल्याने चाळीशीनंतर सगळे संपले, अशी गैरसमजूत दिसते”.
त्या पुढे म्हणाल्या, “लैंगिक संबंधांची भीती वाटणे, पूर्वायुष्यातील काही विदारक अनुभव, स्वतःच्या घरी अनुभवलेले चित्र आणि काहीच कारण नसताना मनात बाळगलेली अपराधीपणाची भावना.. या समस्या स्त्रियांना शरीरापलीकडे मानसिक आणि भावनिक पातळीवर त्रासदायक ठरतात. त्यामुळे सर्व स्त्रियांनी वयाचा मुद्दा मनात न आणता लैंगिक सुखाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, जोडीदारासोबत प्रत्येक वेळी संवाद साधावा, स्वतःचे शरीर समजून घ्यावे, तसेच लैंगिक सुख आणि प्रेम, यांची गल्लत करू नये”, असा सल्ला डाॅ. सबिहा यांनी दिला. व्याख्यानादरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. मोनिका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
