आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने PIMSE तर्फे महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) तर्फे दिनांक 7 मार्च 2025 रोजी लष्कर पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांच्या धैर्य, समर्पण आणि सेवेला सन्मान देणे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि पोलिस दलातील महिला सक्षमीकरणावर विचारमंथन घडवणे हा होता.
कार्यक्रमास संस्थेच्या संचालक प्रभार, डॉ. पोरीनिता बॅनर्जी; वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. गिरीशकुमार दिघवकर; पोलीस निरीक्षक श्री. प्रदीपकुमार पवार; महिला पोलीस उपनिरीक्षक मा. ज्योती कुटे आणि मा. स्वाती बापट उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात PIMSEच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. पायल समदाऱिया यांच्या मार्मिक प्रस्ताविक भाषणाने झाली, ज्यामध्ये महिला दिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला.
यानंतर, डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांनी सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
