Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

बीएनसीए तर्फे ‌राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे, दि. 26: महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) ‌तर्फे ‘मानवी बांधकाम पर्यावरण आणि त्यापलीकडील : आव्हाने आणि संधी‌’ (बिल्ट एनव्हायरमेंट ॲण्ड बियाँड : चॅलेंजेस ॲण्ड अपॉर्च्युनिटी) या विषयावरील शोधनिबंध सादरीकरणावरील दोन दिवसांची तिसरी राष्ट्रीय परिषद येत्या 28 फेब्रूवारी आणि 1 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.

बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून ती संस्थेच्या सभागृहात संपन्न होत आहे. परिषदेच्या निमंत्रक डॉ. वैशाली लाटकर असून सहनिमंत्रक डॉ. मीरा शिरोळकर आणि समन्वयक प्रा. निशिगंधा साखरदांडे यांच्यासह डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांचाही परिषदेच्या आयोजनामध्ये समावेश आहे.

डॉ.अनुराग कश्यप म्हणाले की, या परिषदेतील मानवी बांधकामातील गुंतागुंतीच्या विषयांची उकल करण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून तज्ज्ञ वास्तूरचनाकार, बांधकाम अभियंते, शहर नियोजक, पर्यावरण अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ त्यांचे शोधनिबंध सादर करत आहेत. या तिसऱ्या परिषदेचा अहवाल आम्ही प्रसिद्ध करणार असून त्याचा देशातील बांधकाम तसेच शहर नियोजन क्षेत्र आणि पर्यायाने राष्ट्र उभारणीच्या कामात उपयोगी ठरेल.

बीएनसीएचे उपप्राचार्य डॉ.शार्वेय धोंगडे म्हणाले की, या परिषदेसाठी आतापर्यंत जमा झालेल्या 75 शोधनिबंधांचे तसेच त्यातील 60 शोधनिबंधांच्या सादरीकरणाबाबतचे पूर्वपरीक्षण देशातील आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) आणि एसपीए (स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड रिसर्च) यासारख्या नावाजलेल्या संस्थां मधील तज्ज्ञांनी केले आहे. परिषदेच्या उद्दीष्टातून   मानवी बांधकाम पर्यावरणातील विविध सैद्धान्तिक भूमिका, त्याचा प्रत्यक्षातील अपेक्षित वापर आणि प्रघात यावर विस्तृत विचारमंथन होईल. त्यातून  वास्तूरचनाशास्त्राशी संबंधित आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन मानवी बांधकामातील गुंतागुंतीच्या विषयांची उकल करण्यास उपयोगी ठरेल.

परिषदेच्या निमंत्रक डॉ.वैशाली लाटकर म्हणाल्या की, या परिषदेस वास्तूरचनाक्षेत्रातील शिखर संस्था असणारी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए) आणि आर्किटेक्ट इंजिनियर सर्व्हेअर्स असोसिएशन (एइएसए) या संस्थांची ज्ञानात्मक भागीदारी लाभली आहे. सीओएचे उपाध्यक्ष गजानन राम व सीओएच्या प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राच्या संचालक प्रा. जयश्री देशपांडे या परिषदेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवसांचे अनुक्रमे सन्माननीय पाहुणे असणार आहेत. परिषदेतील दोन बीजभाषणांमध्ये प्रसिद्ध भूशास्त्रकला वास्तूरचनाकार (लॅण्डस्केप आर्किटेक्ट) आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतनसंवर्धक व वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मनीष चलाना तसेच इंग्लंडमधील लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील वरीष्ठ प्राध्यापक मोहन श्रीवर्धेना यांचाही समावेश आहे.

डॉ. लाटकर पुढे म्हणाल्या की, एक प्रकारे समाजाला आकार देण्याचे काम करण्यातील निर्णायक भूमिका मानवी बांधकाम पर्यावरण करत असते. त्यातील भौतिक अवकाश हे मानवी जीवनातील निवास, कार्य, क्रीडा आणि त्यावर आधारित असणाऱ्या जीवनाच्या गुणात्मक दर्जावर अवलंबून असते.  आज बांधकाम क्षेत्रातील आव्हाने अभूतपूर्व असून त्यामध्ये वेगाने होणाऱ्या शहरीकरण, हवामान बदल, संसाधनांमधील कमतरता आणि तंत्रज्ञानावर आधारीत उपाय व परीवर्तनशील विचारशैली यांचा समावेश आहे. यासाठी त्याला पूरक असणारी शाश्वत पायाभूत सुविधेची वाढती गरज आणि हे करताना पर्यावरणाची कमीत कमी हानी यांचा विचारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे टोकाच्या तापमानाला तोंड देणारी लवचिक वास्तूरचना (डिझाईन), कमी कार्बन निर्माण करणारी पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याची गरज व ऊर्जाक्षम तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, सांख्यकी मापदंड (पॅरामेट्रिसीझम) आणि मोठ्या विदेच्या (डेटा) मदतीतून  रचनानिर्मितीमध्ये क्रांतीकारी दृष्टिकोन अंगीकारणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading