एसटी स्थानाकातील महिला सुरक्षेचा आढावा घेणार – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात आज घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. घटनेतील आरोपीला तत्काल अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत त्यात अजून सुधारणा करण्यात येईल. तसेच परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षा यंत्रणेसंबंधी विस्तृत आढावा घेऊन विशेषत: महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यात अधिक सुधारणा करण्यात येईल. असे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार घटनेप्रकरणी वसंत मोरे यांनी ही कारवाई केली आहे. याचा व्हिडिओ देखील वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ठाकरे गटाने यावेळी संपूर्ण स्वारगेट आगार परिसरात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो याचा अर्थ काय? असा सवालही वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. या बलात्काराला सुरक्षा रक्षकच जबाबदार आहेत. या ठिकाणी रोज कोणाला तरी आणले जाते आणि इथे हे सगळे धंदे चालतात. तसेच त्यांनी यावेळी काही बस देखील दाखवल्या जिथे अनेक निरोधचे पाकीट पडलेली होती. याचा अर्थ या ठिकाणी सर्रासपणे बसमध्ये लॉजिंगची सुविधा करण्यात आली आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
