हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारांची उलगडली यशोगाथा
पुणे : सरदार बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, तानाजी मालुसरे अशा स्वराज्यातील हि-यांचे चरित्र नाटयरुपात मांडत भव्य अशा ५० बाय ४० फूट दोन मजली सेटवर तब्बल ५० कलाकारांनी हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारांची यशोगाथा मांडली. शिवराज्याभिषेकासह अफजलखान वध, कोंडाजी कावजी कोंढाळकर, हिरकणी यासंबंधित विविध प्रसंगांचे सादरीकरण पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव २०२५ चे आयोजन दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या कलाकारांनी हिंदवी स्वराज्याचे शिलेदार या विषयावर नाटय सादरीकरण केले. सहा वर्षे विविध विषयांवर हे कलाकार सादरीकरण करीत आहेत.
शिवजयंती उत्सवांतर्गत लेखक केतन पुरी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलेल्या परकीय व्यक्ती याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तर, इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान झाले. त्याला देखील पुणेकरांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, स्वराज्याच्या शिलेदारांचा इतिहास व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे पैलू सर्वांसमोर यावे आणि त्यातून मार्गदर्शक दिशा मिळावी. तसेच समाजप्रबोधन व्हावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. ट्रस्टतर्फे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. शिवजयंतीच्या निमित्ताने देखील असे उपक्रम ट्रस्टतर्फे घेण्यात येत आहेत.
