बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन
पुणे: बीव्हीजी इंडिया उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड व त्यांचे बंधू डॉ. दत्तात्रेय गायकवाड यांच्या मातोश्री सीताबाई रामदास गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 70 वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
देश विदेशातील उद्योग, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी व राजकीय नेत्यांनी सीताबाई गायकवाड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सीताबाईंनी महापालिकेच्या शिक्षण मंडळात प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले. पती रामदास यांच्या निधनानंतर त्यांनी मोठ्या निर्धाराने व कष्टाने आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळेच बी व्ही जी ग्रुप तब्बल एक लाख जणांना रोजगार देऊ शकला, असे मत हनुमंतराव गायकवाड यांनी नेहमीच कृतज्ञतेने व्यक्त केले आहे.
सीताबाई यांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी उपक्रम राबवले. नुकतेच त्यांनी सांगवी परिसरातील अनेक नागरिकांना स्वखर्चाने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या निधनाने सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे.
