महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्य तुला व सोने-चांदी पुष्पअर्पण
पुणे : ब्रह्मोत्सवात श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य मुळशी तालुक्यातील किरवली, सावरगाव अशा आदिवासी भागांत देण्याचा उपक्रम महालक्ष्मी मंदिरात पार पडला. राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्य जी महाराज यांच्या हस्ते धान्यतुलेत धान्य व देवीला सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी विश्वाच्या सुख-शांती समृद्धी करिता प्रार्थना करण्यात आली.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम सुरु आहेत. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकुमार अग्रवाल म्हणाले, सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंदिरातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली, श्री विष्णू या उत्सव मूतीर्ची धान्यतुला करुन ते धान्य आदिवासी भागात देण्याचा उपक्रम यंदा राबविण्यात आला. धान्यतुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, बिस्कीटे व खाऊ ठेवण्यात आला होता. याशिवाय सोने व चांदीची फुले देखील मान्यवरांच्या हस्ते उत्सवमूर्तीला अर्पण करण्यात आली.
याशिवाय पुण्यातील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. मंदिरात गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना करुन उत्सवाचा प्रारंभ झाला. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून विविध धार्मिक, सामजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
