Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आयुष्यात कुटुंब हा घटक मोठा – सचिन तेंडुलकर यांची भावना

 

पुणे : आयुष्यात कुटुंब या घटकाला खूप महत्व आहे, आपल्या चांगल्या क्षणी, अडचणीच्या प्रसंगी कोणतीही अपेक्षा ना ठेवता तुमच्याबरोबर तुमचे कुटुंबच असते, क्रिकेट खेळात असताना घर​, ड्रेसिंग रूम आणि करोडो भारतीय ही माझी फॅमिलीच होती अशी भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर याने रविवारी व्यक्त केली. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन​ कर्वे नगर येथील पंडित ​फार्म्स ​येथे करण्यात आले होते. भारतरत्न सचिन तेंडुलकर ​यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम​ संपन्न झाला. यावेळी माधव, श्रीकृष्ण, संजय, केदार व इंद्रनील चितळे उपस्थित होते.

चित्रकार कपिल भीमकर यांनी काढलेले चित्र देऊन सचिनचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बासरीवादक अमर ओक, कवी वैभव जोशी आणि पंडित आनंद भाटे यांनी विशेष कार्यक्रम सादर केला. त्यानंतर क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली.

आवड, नेतृत्वक्षमता आणि कामाप्रती असणारी वचनबद्धता असली कि कामामध्ये यश मिळते. चितळे बंधूनी हे गुण जपत आपले कुटुंब एकत्र ठेवून व्यवसाय वाढवला आज त्यांच्याबरोबर आपण जोडले गेलो असल्याचा आनंद असल्याची भावना सचिनने यावेळी व्यक्त केली.​ माझी बहिण लग्नानंतर पुण्यात राहायला आली त्यामुळे मी पण कुठेतरी थोडासा पुणेकर आहे असे सांगत सचिन म्हणाला की मुंबईसाठी जुनिअर लेव्हलला खेळायच्या करिअरची सुरुवात १९८५ साली पुण्यात झाली होती, त्यामुळे पुणे कायमच माझ्यासाठी विशेष आहे.

आयुष्यात शॉर्टकटला घेणे चुकीचे असल्याचे सांगताना सचिन म्हणाला, तुला यश मिळाले नाही तर तू अपयश पचव, पण त्यासाठी शॉर्टकट घेऊ नकोस, असे धडे मला घरातूनच मिळाले होते. शाळेत असताना उन्हाळ्याची सुटी होती, तेव्हा मी खूपच मस्तीखोर होतो, झाडाच्या कैऱ्या पाड, कुणाच्या गाडीची हवा सोड असे उद्योग करायचो, त्यामुळे माझा मोठा भाऊ मला रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेला आणि माझे क्रिकेट सुरु झाले.

आजकाल अपेक्षांचे ओझे खूप असते त्यामुळे प्रेशर येते असे आपण ऐकतो. तुझ्यावर १०० कोटींपेक्षा जास्त भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे असायचे त्या तू कसे हाताळले असा प्रश्न विचारला असता सचिन म्हणाला की आपल्यावर दबाव असणे आवश्यक आहे, तसे असेल तर काम चांगले होते. २०११ मध्ये विश्वचषक खेळत असताना संघाच्या बैठका व्हायच्या, त्यामध्ये अपेक्षा व्यक्त व्हायच्या, आपण विश्वचषक जिंकायला हवा, अशी प्रत्येकाची भावना असायची. आपल्याला हा कप जिंकायचा आहे, पण त्याचा दबाव घेऊ नका, अशा चर्चा तेव्हा व्हायच्या. पण सकारात्मकते बरोबरच प्रत्येकजण दबावात होता, त्यामुळे विश्वचषक जिंकू शकलो, त्यामुळे आयुष्यात दबाव असणे आवश्यक असल्याचे सचिन यावेळी म्हणाला.​

१९८३ मध्ये भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता, त्यामुळे आपण एकदा तो उचलायला हवा अशी भावना सहा वर्षांचा असतानाच माझ्या मनात आली होती. माझे कोच आचरेकर सर माझ्याकडून कसून सराव करून घ्यायचे आणि सरावानंतर स्टम्पवर एका रुपयांचे नाणे ठेवायचे आणि तू १० मिनिटे आउट व्हायचे नाही असे सांगायचे. शिवाजी पार्कच्या मैदानात कुणीही तुझा झेल घेतला ​की तू आउट असा नियम आचरेकर सरांनी मला घालून दिला असल्याने मला १० मिनिटे आऊट ना होता खेळावेच लागायचे व चेंडू हवेत मारता यायचा नाही. सरांच्या या शिकवणीतून आयुष्यात शॉर्टकट न घेता मानसिक दृष्टया सक्षम होण्याचा गुण अवगत झाल्याची आठवण सचिनने यावेळी सांगितली.

चूक केली तर आपला कान धरणारी व्यक्ती हवी? या प्रश्नाचे उत्तर देताना बंगळुरूमध्ये ऑस्ट्रलियाबरोबरच्या सामन्यात आपण केलेली चूक आणि त्याबदल्यात अजितने धरलेला कान याची आठवण ताजी केली. मी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण दोघेजण फलंदाजी करत होतो, माझ्या ३५ धावा झाल्या होत्या. मैदानावर प्रेक्षकांचा गलका सुरु होता​ ​आणि ​दुसरी भाव घेण्याच्या प्रयत्नात मी रन आउट झालो. तेव्हा मी मैदानावर नाराजीची प्रतिक्रिया दिली आणि तंबूत परतलो. मॅच झाल्यावर घरी परतलो, तेव्हा अजित मला म्हणाला, तू बाद झाल्यावर तिथे प्रतिक्रिया देण्याची काय गरज होती, त्यामुळे​ व्ही व्ही एस लक्ष्मण विचलित झाला असेल​, त्याला तर पुढे फलंदाजी करायची होती असे म्हणत त्याने माझी ​अशी प्रतिक्रिया चुकीची होती हे दाखवून दिले.

अजित मला आचरेकर सरांकडे घेऊन नसता तर मी क्रिकेटपटू म्हणून घडलो नसतो. अनेक खेळाडू माझ्यासाठी धावले नसते तर माझ्या इतक्या धावा झाल्या नसत्या, माझे कुटुंब, मित्र, ग्राउंडमन असे अनेकजण माझ्यासाठी नेहमीच तयार असायचे. आवड असली कि त्याला सीमारेषा नसतात, असेही तो एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.

७५ वर्षाच्या अभिमानाची चवीची परंपरा ही ग्राहकांमुळे टिकून असल्याचे श्रीकृष्ण चितळे यावेळी म्हणाले. मागे वळून पाहताना घरातल्या प्रत्येकाने व्यवसाय वाढवण्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. रघुनाथराव मुंबईमध्ये व्यवसाय करायचे तेव्हा, युद्धाचे दिवस होते. सैन्याला मोठ्या प्रमाणात लोण्याची आवश्यकता असे तेव्हा ते जळगाव, मुंबई या भागातून प्रवास करून लोणी मिळवून देत असत. १९६१ मध्ये पुण्यात आलेल्या पानशेत पुराच्या दरम्यान राजाभाऊ चितळे यांनी आपला कारखाना बंद ठेवून दुकानातील कर्मचारी मंडळींची राहण्याची व्यवस्था केल्याची आठवण त्यांनी सांगितली. आधीच्या पिढीने लावलेल्या हे रोप पुढे नेत नव्या पिढीने त्यावर कळस चढवला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ग्राहक हा आमच्यासाठी कायमच ब्रँड अँबेसिडर राहिलेला आहे. विश्वास, गुणवत्ता या तत्वामुळेच आणि चितळे कुटुंबातील अन्नपूर्णा यांनी दिलेल्या गुणवत्तेच्या जोरावरच आमची उत्पादने अमेरिका आणि जगाच्या अनेक भागात जाऊन पोहचली आहेत, भविष्य काळात विदेशात अनेक ठिकाणी प्लँट सुरु करण्याचा मानस असल्याचे संजय चितळे यावेळी म्हणाले.​ येत्या काळात आम्ही लॉयल्टी प्रोग्रॅम सुरु करणार असल्याचे केदार चितळे यांनी सांगितले.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले, इंद्रनील चितळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading