योगसाधनेमुळे आयुष्य होते आनंददायी; पद्मश्री व योगश्री डॉ. नागेंद्रगुरुजी यांचे प्रतिपादन
पुणे : आयुष्यात फक्त आर्थिक संपत्ती असण्याला महत्व देण्याच्या बरोबरच आपले आरोग्य देखील उत्तम कसे राहील, याकडे देखील अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जीवनात जर आनंद मिळवायचा असेल तर त्यावर योगसाधना हा सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रतिपादन बंगळुरूच्या स्वामी विवेकानंद योग विद्यापीठाचे संस्थापक पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्रगुरुजी यांनी केले. कमलबाई हुकमीचंद चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे आणि बंगळूरू येथील विवेकानंद योग अनुसंधान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात सुरु करण्यात येत असलेल्या विश्वानंद केंद्र योग चिकित्सा विभागाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्रगुरुजी यांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील डॉ. नितू मांडके भवनातील संचेती सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला.
राज्याच्या नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसळ, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थानच्या संचालिका डॉ. के. सत्य लक्ष्मी, कमलबाई हुकमीचंद चोरडिया चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त राजकुमार चोरडिया, मधुबाला चोरडिया, आनंद चोरडिया आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
नॅचरोपॅथी, योगा यांचा अवलंब केला तर आपल्या जीवनशैलीमध्ये चांगल्या प्रकारचा बदल होतो. अलीकडच्या काळात आजारांचे स्वरूप देखील बदलत चालले आहे. आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे त्यावर उपचार करणे शक्य बनले आहे. तंत्रज्ञानात देखील नवे बदल होत आहेत, या गोष्टी चांगल्या असल्या तरी तिथे विविध प्रकारची आव्हाने उभी आहेत. आयुर्वेद, योगा यांना मोठा इतिहास असल्याचे डॉ. नागेंद्रगुरुजी यावेळी म्हणाले.
योगसाधनेमध्ये वेगळी ताकत आहे, त्याच्या आधारे अनेक गंभीर आजरांवर मात करणे शक्य आहे. आपण जर जीवनात आनंद मिळवण्याचे ठरवले असेल तर योगसाधना त्यामध्ये अधिक उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना माधुरी मिसाळ यांनी बंगळूरू केंद्रात आलेल्या सकारात्मक अनुभवांविषयी उपस्थितांना माहिती दिली. योगामध्ये असलेली ताकद यानिमित्ताने अनुभवली असेही मिसाळ यांनी सांगितले.
नॅचरोपॅथी, योगा या दोन्ही गोष्टींच्या आधारे आरोग्य उत्तम राहू शकते, असे डॉ. के. सत्य लक्ष्मी यांनी संगितले. पुण्यामध्ये राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान या संस्थने केलेले काम मोठे असून लोकांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. आदिवासी मुलांसाठी आंबेगावजवळ एक नॅचरोपॅथी सेंटर नव्याने सुरु करण्यात आले त्याचबरोबर कोंढवा परिसरात २५ एकर जागेमध्ये मोठा कॅम्पस उभा करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.
योग अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी कव्हाणे यांनी केले. राजकुमार चोरडिया यांनी आभार मानले.
