Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

‘वसंतोत्सव’च्या तिसऱ्या दिवसाची आर डी ओरिजनल्सने सुरुवात!

पुणे : पुण्यात गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या ‘वसंतोत्सव’चा आज तिसरा व शेवटचा दिवस सूर्यकांत काकडे फार्म कोथरूड येथे संपन्न झाला. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या १८ व्या महोत्सवात आज सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि हरीहरन यांनी गायन प्रस्तुती केली.

आज महोत्सवासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक तेजस व राजस उपाध्ये आदी उपस्थित होते. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पुनीत बालन यांनीही आज महोत्सवाला भेट दिली. सुप्रसिद्ध गायन हरिहरन यांनीही यावेळी राहुल देशपांडे यांच्या गायनाचा समोर बसून आस्वाद घेतला.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात राहुल देशपांडे यांनी त्यांच्या आर डी ओरिजनल्स या संकल्पनाधारित कार्यक्रमाने केली. राहुल यांनी विविध चित्रपटांसाठी गायलेली आणि त्यांची काही स्वरचित गाण्यांच्या या मैफिलीला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘सूर से सजी संगिनी…’ हे कट्यार काळजात घुसली संगीत नाटकातील पद, ‘तृषा…’ हे अमलताश चित्रपटातील गीत, खळखळ गोदा हे गोदावरी चित्रपटातील गीत, कैवल्यगान… हे मी वसंतराव चित्रपटातील गीत, श्रीरंगा विठ्ठला…, वो जो हम मैं, तुम मे करार था… अशा काही गाजलेल्या रचना आणि त्याचबरोबर ‘रोग दिलको लगा गये…’, ‘सितारों से उलझता जा रहा हू…’, या दोन गझल, ‘साहेब हे रंगरेज…’ हे संत कबीरांचे निर्गुणी भजन अशा काही नवीन अनवट रचनादेखील राहुल यांनी सादर केल्या. ‘दिल की तपिश…’ या कट्यार काळजात घुसली मधल्या गाजलेल्या रचनेने राहुल यांनी सत्राचा शेवट केला.

“वसंतोत्सवाचा रसिक हा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे हे तुम्ही सिद्ध केलंत कारण पहिल्या दिवशीचं रॉक म्युझिक, दुसऱ्या दिवशी सादर झालेलं शास्त्रीय संगीत आणि आज सादर होत असणाऱ्या या सर्व रचना असं सगळं वैविध्यपूर्ण संगीत तुम्ही सगळे गेले तीन दिवस ऐकत आहात आणि दाद देत आहात त्यासाठी मी खरंच सर्व पुणेकरांचा आभारी आहे” असं राहुल देशपांडे म्हणाले.

राहुल देशपांडे यांना निखिल फाटक (तबला), संजय धास (गिटार), मनीष कुलकर्णी (बेस गिटार), विशाल धुमाळ (कीबोर्ड), गणेश थोरात (ड्रम्स), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) आणि सारंग कुलकर्णी (सरोद) या कलाकारांनी साथसंगत केली.

यावेळी ‘नाट्यसंगीताची वाटचाल’ या कार्यक्रमाबद्दल राहुल यांनी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी प्रियांका बर्वे, अमेय वाघ आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी उपस्थित होते. नवीन स्वरूपात नाट्य संगीत, संगीत नाटक रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे यावेळी निपुण धर्माधिकारी यांनी नमूद केलं.

यानंतर सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांनी यानंतर आपल्या सादरीकरणाने पुणेकरांवर जणू मोहिनी घातली. गायनाला प्रारंभ करण्यापूर्वी ते म्हटले की १८ वर्षांपासून एखादा महोत्सव सुरू आहे ही कमालीची गोष्ट आहे. त्यामध्ये राहुल देशपांडे आणि आयोजकांसोबतच तुम्हा रसिकांचं पण योगदान आहे. मुमताज राशिद साहेब यांच्या बेखयाली… या गझल ने त्यांनी मैफिलीचा आरंभ केला. यानंतर त्यांनी ‘ प्यारी अगर है जिंदगी…’ ही गझल सादर केली.

हरिहरन यांना उस्ताद लियाकत अली खा (सारंगी), अकलाख वारसी (हार्मोनियम), शादाब शकुरी वारदिया (तबला), गौरव वासवानी (कीबोर्ड), संजय धास (गिटार) या कलाकारांनी साथ संगत केली. स्नेहल दामले आणि विघ्नेश जोशी यांनी महोत्सवाचे सूत्रसंचलन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading