Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने रंगला वसंतोत्सव चा दुसरा दिवस

 

पुणे  : कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे संपन्न होत असलेल्या १८ व्या वसंतोत्सवचा दुसरा दिवस आज मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने रंगला.

वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने सादर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज महोत्सवासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, सुप्रसिद्ध व्हायोलिन तेजस व राजस उपाध्ये आदी उपस्थित होते. केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आज महोत्सवाला भेट दिली.

पंडित संजीव अभ्यंकर यांनी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात राग बागेश्री गाऊन केली. त्यामध्ये त्यांनी बडा ख्याल आणि त्यानंतर ‘जा रे बलमा तोसे नाही बोलू…’ ही मेवाती घराण्यातली पंडित जसराजांची पारंपारिक बंदिश सादर केली. त्यानंतर पंडितजींनी जोगकौंस रागात त्यांनी स्वतः रचलेली ‘इतनी बिनती सुनो मोरी पिया…’ ही बंदिश प्रस्तुत केली. यानंतर त्यांनी बहारदार पद्धतीने तराणा सादर करीत आपल्या गायनाचा समारोप केला.

पंडित संजीव अभ्यंकर यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), प्रथमेश तारळकर (पखवाज), साईप्रसाद पांचाळ, धनंजय म्हसकर (स्वरसाथ), मुक्ता जोशी, अबोली देशपांडे (तानपुरा) आणि उद्धव कुंभार (साईड रिदम) यांनी साथसंगत केली. स्नेहल दामले आणि विघ्नेश जोशी यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading