श्रीराम लागू रंग अवकाशच्या वर्षपूर्तीनिमित्त अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन
बदलत्या जगासोबत बदलत असलेली नाटकाची परिभाषा व प्रायोगिक रंगभूमी यांचा विचार करीत दिग्दर्शक व कलाकारांना आवश्यक असलेल्या अवकाशाची गरज पूर्ण करण्याच्या हेतून श्रीराम लागू रंग अवकाश या प्रकल्पाची उभारणी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या कुटुंबियांच्या मदतीने करण्यात आली. हा प्रकल्प ‘ब्लॅक बॉक्स’ या संकल्पनेवर आधारित असून विविध स्वरूपातील, पर्यायातील रंगमंचीय व्यवस्था उपलब्ध करून देत प्रायोगिक रंगभूमीला सर्जनशीलतेचा नवा आयाम देणारी अशी ही सुविधा आज पुण्यातील नाट्यधर्मींसोबतच रसिकांच्या देखील पसंतीस उतरत आहे. प्रोसेनियम थिएटर, सँडविच थिएटर, थ्रस्ट सिटींग आणि फोर साईड अरेना सिटींग अशा चार विविध पद्धतीने रंगमंचाची रचना येथे करता येणे शक्य असून एका वेळी १४० ते २०० नागरिकांना याठिकाणी नाटके, कार्यशाळा, सांस्कृतिक व कला विषयक कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतात.
मागील वर्षभराच्या काळात अनेक कलाप्रकारांचे सादरीकरण श्रीराम लागू रंग अवकाश येथे झाले यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण होता. नजीकच्या भविष्यात देखील प्रकल्पाची ही वाटचाल सुरु राहील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. हे होत असताना कला, माणसं आणि आठवणी असं साऱ्यांनीच समृद्ध असे हे वर्ष साजरे करण्यासाठी श्रीराम लागू रंग अवकाशच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही राजेश देशमुख यांनी सांगितले.
या अंतर्गत शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी सायं ४ वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे हॉलिवूडचे यशस्वी चित्रपट दिग्दर्शक असलेल्या स्टीव्हन स्पीलबर्ग यांवर आस्वाद, विश्लेषण आणि चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पीलबर्ग यांचा सिनेमा आणि त्यांची चित्रशैली या विषयावर चर्चा होईल. यामध्ये सतीश जकातदार, दीपक देवधर आणि सुहास किर्लोस्कर यांचा सहभाग असेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे.
यानंतर सायं. ७.३० वाजता श्रीराम लागू रंग अवकाश येथे ‘रात की रानीयां’ हे इंग्रजी-हिंदी नाटक सादर होईल. या नाटकाची पटकथा आणि दिग्दर्शन हे त्रिशला पटेल यांचे असून यामध्ये जया विरलेय, फातिमा आरिफ, आंचल पोद्दार, सोहिनी नियोगी, संजीना गढवी आणि अक्षय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे नाटक सशुल्क आहे.
यानंतर शनिवार दि. १८ जानेवारी रोजी सायं ५ वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृहात विदुषी शोभा गुर्टू यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत त्यांच्या शिष्या राजश्री पाठक यांच्या पुढाकाराने ‘स्वर- शोभा’ या विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. संध्या काठवते यांचे शास्त्रीय गायन संपन्न होईल. यावेळी पं. अरविंद आझाद (तबला) तर सुयोग कुंडलकर (संवादिनी) हे साथसंगत करतील. यानंतर सायं ७.३० वाजता श्रीराम लागू रंग अवकाश येथे सुप्रसिद्ध भरतनाट्यम् कलाकार वैभव आरेकर हे आपला ‘वेणूगान’ हा नृत्यविषयक कार्यक्रम संपन्न होईल. हा कार्यक्रम सशुल्क असणार आहे.
वर्षपूर्तीच्या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये (रविवार, दि. १९ जानेवारी) सकाळी ११ वाजता ‘रिमेंबरिंग रझा’ या विषयावर श्रीराम लागू रंग अवकाश येथे भोपाल येथील सुप्रसिद्ध चित्रकार आणि नवी दिल्ली येथील रझा फाऊंडेशनचे अखिलेश यांचे व्याख्यान संपन्न होईल. याबरोबरच चित्रकार रझा यांच्या चित्रांच्या प्रिंट्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक मुकुल शिवपुत्र यांच्या उपस्थितीत होईल. सदर चित्रप्रदर्शन हे रझा फाऊंडेशनच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल याची नोंद घ्यावी. यावेळी अखिलेश आणि सुप्रसिद्ध कथक गुरु शमा भाटे यांचा कार्यक्रमामध्ये विशेष सहभाग असणार आहे.
यानंतर सायं ५ वाजता श्रीराम लागू रंग अवकाश येथे ‘अनथिंकेबल एक्स्पीरिअन्स अॅट अनरिचेबल प्लेसेस फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल’ या वन्यजीव छायाचित्रणाशी संबंधित विक्रम पोतदार यांच्या स्लाईडशोचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल. यानंतर सायं ७.३० वाजता श्रीराम लागू रंग अवकाश येथे थिएटर अकॅडमी निर्मित आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत ‘कामातुराणाम्’ या वात्सायनाच्या कामशास्त्रावर आधारित भारतीय शृंगारकाव्य आणि शृंगारकथांच्या
अभिवाचनाचा कार्यक्रम होईल. यामध्ये माधुरी पुरंदरे, हृषीकेश जोशी आणि किरण यज्ञोपवित सहभागी असतील. सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल याची कृपया नोंद घ्यावी.
