डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता भरतनाट्यम मूल्य-वर्धित अभ्यासक्रमाची उत्साहात सुरुवात
पिंपरी : : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे यांच्यातर्फे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांसाठी भरतनाट्यम ह्या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाची सुरुवात डिसेंबर २०२४ पासून सुरु केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासात भारतीय शास्त्रीय मंदिर कलांचा समावेश केला आहे. या अभ्यासक्रमाच्या समावेशामुळे विद्यार्थ्यांना ताणमुक्त होण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी, एकूणच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि कौशल्यगुणात्मक विकास घडविण्याकरिता हा सर्जनशील पर्याय वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.
९ आठवड्यांचा हा अभ्यासक्रम सध्या एमबीबीएस विद्यार्थ्यांकरीत असून फिजिओलॉजी विभागाद्वारे चालवला जाईल. या अभ्यासक्रमाचे वर्ग प्रत्येक मंगळवार आणि गुरुवारी दुपारी ४:०० ते ५:०० दरम्यान घेतले जातील. प्रख्यात गुरु डॉ. स्वाती दैठणकर यांचे मार्गदर्शन या अभ्यासक्रमासाठी लाभणार आहे. भारतनाट्यम या शास्त्रीय नृत्यकलेतून स्थिरता, शांतता व एकाग्रता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, रस, ताल, अभिनय आणि पौराणिक कथा यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. तसेच दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासह जागतिक नृत्य दिन साजरा करण्याचेही या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या अभ्यासक्रमाचे नेतृत्त्व गुरू डॉ. स्वाती दैठणकर, करत असून त्यांनी माहिती देताना सांगितले, “भरतनाट्यम हा केवळ नृत्य प्रकार नसून आत्म-अभिव्यक्ती आणि आंतरिक संतुलनाचे एक माध्यम आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भरतनाट्यम विषयासंबंधी गहन सौंदर्यशास्त्राची ओळख करून देईल. त्यांना ताल, समन्वय आणि लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व शिकवेल.”
या अभ्यासक्रमाबाबत मत व्यक्त करताना करताना डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील, प्र कुलपती – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, पुणे म्हणाल्या, “ या उपक्रमाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या कठीण शैक्षणिक प्रवासातून एक अर्थपूर्ण विश्रांती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शारीरिक
हालचाली, एकाग्रता आणि सांस्कृतिक समृद्धीचे मिश्रण हे त्यांच्यासाठी एक उत्तम अनुभव ठरेल. भरतनाट्यम या कलाप्रकारात शारीरिक हालचाल, कौशल्यवृद्धी, कलेची जिज्ञासा आणि सांस्कृतिक सखोलतेचा संयोग आढळतो. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाबरोबर कौशल्य विकासामध्ये भरतनाट्यम कलेची रुची रुजविण्याचा एक उत्तम आदर्श निर्माण होईल.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणेचे विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले, “भरतनाट्यम हा मूल्यवर्धित अभ्यासक्रम सर्वांगीण शिक्षणविषयक वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. हा विद्यार्थ्यांना निव्वळ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी जोडत नाही तर त्यांना ताण तणाव मुक्ती, मनशांती, एकाग्रता, कलेची गोडी, शारिरीक लवचिकता व निरोगी आरोग्यदायी वातावरण निर्माण करते आणि त्यांची एकूण शैक्षणिक कामगिरी वाढवण्याच्या साधनांनी देखील सुसज्ज करतो.”
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रच्या अधिष्ठाता (डीन) डॉ. रेखा आर्कोट म्हणाल्या, “वैद्यकीय शिक्षण खूपच कठीण असते आणि यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना संतुलन साधण्यास तसेच लवचिकता निर्माण करण्यास मदत होईल. लय आणि अभिव्यक्तीवर लक्ष केंद्रित करून भरतनाट्यम वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी आवश्यक असलेल्या जागरूकता, शिस्त आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते.”
या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना भारतनाट्यमच्या इतिहास आणि सौंदर्यशास्त्राची माहिती दिली जाईल.
शास्त्रीय नृत्यकलेच्या स्वरूपाचे सखोल ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना संपूर्ण विकासासाठी प्रेरित करण्याचे ध्येय या उपक्रमा मार्फत केले जाणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राने सुरू केलेल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी समर्पित शिक्षणाची बांधिलकी सिद्ध केली आहे.
