वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील – डॉ. सुरेश गोसावी
विद्यापीठाने नायगाव येथे उभा केलेल्या ग्रंथालयास भेट
वाचनाने माणूस समृद्ध होतो. पुस्तके माणसाला सर्जनशील बनवितात. माणसांच्या आयुष्याला सर्वाधिक मार्गदर्शन पुस्तके करत असतात. शब्द माणसांना घडवितात. त्यामुळे तरुणांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठातील अधिकार मंडळातील सदस्यांनी सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे भेट दिली. यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांसह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ या विभागांचे संचालक उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नायगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी याकरिता प्रशस्त ग्रंथालय उभे केले आहे. या ग्रंथालयाचा लाभ नायगाव येथील वाचनप्रिय विद्यार्थी घेत आहेत.
