मोहित कंबोज यांनी घडवून आणला ईव्हीएम घोटाळा; उत्तम जानकर यांचा नवा आरोप
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कांबोज यांनीच ईव्हीएम घोटाळा घडवून आणला असून त्यामुळेच विधानसभेत महायुतीला भरघोस यश मिळाले, असा नवा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत नाही मात्र विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे ईव्हीएम चा घोळ करण्यात आल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार जानकर यांनी केला. या निवडणुकीत ईव्हीएमने केवळ महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि महायुतीतील घटक पक्ष यांचीच मते दाखवली. इतर स्वतंत्र पक्षांची मते भारतीय जनता पक्षाकडे वळवण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
मारकडवाडी प्रकरणापासून सातत्याने मतदान यंत्रात घोटाळा करून महायुती सरकार सत्तेवर आल्याचा आरोप जानकर करीत आहेत. हे सरकार दीर्घकाळ टिकणार नाही. चार महिन्यात सरकारला पायउतार व्हावे लागेल, या दाव्यावर देखील आपण ठाम आहोत, असेही जानकर यांनी सांगितले.
भाजपने ईव्हीएम घोटाळा करण्याची जबाबदारी कंबोज यांच्यावर सोपवली होती. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उचलून घेताना १२० हा आकडा उच्चारला होता. त्यावरून आपल्याला खात्री आहे की मतदान यंत्रात घोटाळा करण्याची जबाबदारी काम्बोज यांनी पार पाडली आहे, असे जानकर म्हणाले.
जानकर हे अपघाताने आमदार
दरम्यान, भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जानकर यांची खिल्ली उडवली आहे. जानकर हे अपघाताने आमदार झाले आहेत. ते फार उथळ बोलतात. इतके उथळपणे बोलू नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.
