महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी कामाला लागा – राज ठाकरे
मुंबई: विधानसभा निवडणुकीत जे काही घडले त्याची खंत बाजूला ठेऊन विविध समस्या आणि आव्हानांनी ग्रासलेल्या महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी कामाला लागा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.
नववर्षानिमित्त दिलेल्या संदेशात ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक सुस्पष्ट कार्यक्रमच आखून दिला आहे. मनसेला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला. लोक वेगवेगळ्या समस्या आणि संकटांना सामोरे जाताना मदतीसाठी मनसेकडे अपेक्षेन पाहतात. मात्र, मतदान करताना मागे सरकतात असे दिसून आले आहे. तरीही महाराष्ट्र सध्या अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यामुळे निवडणूक निकालाची खंत न बाळगता कामाला लागण्याची आवश्यकता आहे, असे ठाकरे यांनी मनसैनिकांच्या निदर्शनास आणून दिले.
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच मुंबईत मराठी माणसांवर हल्ले सुरू झाले. त्यावेळी मनसेने या मुजरांना धडा शिकवावा अशी अपेक्षा व्यक्त झाली. ती आपण पूर्णही केली. महागाई, बेरोजगारी यामुळे राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी यांचे जगणे अवघड झाले आहे. भूमिपुत्र रोजगार वाचून वंचित आहेत मात्र परप्रांतीयांच्या लोंढ्यांना रोजगार उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्रातील मराठीच असलेले दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे केले गेले आहेत.
राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी पक्षाच्या शाखा शाखांमध्ये संपर्क कक्ष सुरू करा. महिलांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंदवल्या जात नसतील तर त्यासाठी पाठपुरावा करा. तरीही काही होत नसेल तर अत्याचारी नराधमांना फोडून काढा, असे स्पष्ट निर्देश ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.
महागाई हा राज्या पुढील मोठा प्रश्न आहे. अशावेळी साठेबाजी होत आहे का यावर बारकाईने नजर ठेवा. तसे होत असेल तर संबंधित विभागांना त्याची माहिती द्या. शेतकरी आणि जनता यांच्यातला दुवा बना. आपली शाखा आणि कार्यालय सर्वसामान्यांसाठी खुली करा. आपल्या विचार आणि कार्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर आवश्यकच आहे. मात्र, आपण त्याच्या धीन होत नाही ना, आपण समाज माध्यमे वापरण्याऐवजी समाज माध्यम आपल्याला वापरत नाही ना, याचे भान ठेवा, अशा सूचनाही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
मनसैनिक, महाराष्ट्रातील जनता यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील राज ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निकालानंतर जाहीर केल्याप्रमाणे समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन, शांतता, सलोख्याचे वातावरण निर्माण करून विकास आणि आधुनिकीकरणाने महाराष्ट्राला अग्रेसर बनविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यासाठी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
