Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

वाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण

पुणे:  खंडणीचा गुन्हा दाखल असलेला आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनात सहभाग असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड हा अखेर पोलिसांना शरण आला आहे. येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अर्थात सीआयडीच्या कार्यालयात त्याने शरणागती पत्करली. शरण येण्यापूर्वी त्याने स्वतःची चित्रफीत जाहीर केली असून त्यात आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या हत्येमागे कराड सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. तो मुंडे यांच्याबरोबर एक दशकापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत आहे. परळीच्या नगराध्यक्ष पदावरही तो होता. धनंजय मुंडे यांची संपूर्ण मदार त्याच्यावर होती. राजकीय संरक्षण प्राप्त झाल्यानेच त्याच्या अटकेला विलंब होत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. याप्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील होत आहे. 

या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांना शरण आला आहे. शरण येण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत त्याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. केवळ राजकीय द्वेषातून आपल्याला खंडणी आणि संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचा त्याचा दावा आहे. केज पोलीस ठाण्यात आपल्या विरुद्ध करण्यात आलेली खंडणीची फिर्याद खोटी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या सर्वांना फाशी दिली जावी. राजकीय द्वेषा पोटी आपले नाव त्यात गोवण्यात आले आहे. तरीही पोलीस तपासात आपण दोषी असल्याचे आढळल्यास न्यायदेवता जी शिक्षा देईल ती बघण्यास आपण तयार आहोत, असे कराड याने चित्रफितीत म्हटले आहे. 

दरम्यान, वाल्मीक कराडचे शरण येणे हे सीआयडी चे अपयश आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कराड याला अटक करण्यासाठी सीआयडीने तब्बल दीडशे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली नऊ पथके स्थापन केली आहेत. कराडच्या पत्नीसह त्याच्याशी संबंधित अन्य दोन महिलांची चौकशी सीआयडीने केली आहे. त्याची आणि कुटुंबीयांची शंभरहून अधिक बँक खाते देखील गोठवली आहेत. आता कराड शरण आल्याने सीआयडीच्या तपासाला अधिक वेग येणे अपेक्षित आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading