आमदार सुरेश धस यांनी डागली मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तोफ
बीड: प्रतिनिधी
आका, बाकांच्या दहशतीमुळे केवळ परळीतच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात अराजक माजले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात संताप आहे. त्यामुळे याप्रकरणी लवकरात लवकर सखोल चौकशी व्हावी आणि आका बाकांची रवानगी बिन भाड्याच्या खोलीत करावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करतानाच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मात्र त्यांनी आरोपांची तोफ डागली आहे.
केज तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर आणि स्पष्ट निवेदन दिले आहे. कुणाच्या प्रकरणात आतापर्यंत कोणत्या कुटुंबीयांना शासकीय मदत क्वचितच मिळाली असेल. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी या प्रकरणाचा तपास करणार आहे. न्यायालयीन चौकशीही होणार आहे. आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हे दाखल होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या निवेदनावर अक्षय घेण्याचे कारण नाही, अशा शब्दात आमदार धस यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
मागच्या पालकमंत्र्यांनी भाड्याने दिले आपले पद
बीडमध्ये कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही. तब्बल 200 कुटुंबांनी आपले घर व्यवसाय सोडून जिल्हाबाहेर जाणे पसंत केले आहे. व्यापाऱ्यांना व्यापार करणे अशक्य झाले आहे. सरपंच हत्या प्रकरणानंतर तर अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी करतानाच मागचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले पालकमंत्री पद भाड्याने दिले होते, असा आरोपही त्यांनी केला. धनूभाऊंना कशाचे गांभीर्य राहिलेले नाही. ते पूर्वी फार चांगले होते. मात्र, मागील पाच वर्षात त्यांच्या वर्तनात फरक पडला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
