Monday, June 8, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई: चित्रपटांना केवळ करमणुकीचे साधन न मानता प्रेक्षकाला विचारप्रवण बनविण्याचे प्रभावी साधन मानणारे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककाळा पसरली आहे. 

श्यामसुंदर श्रीधर बेनेगल यांचा जन्म त्रिमुलागिरी, हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर बेनेगल हे उत्तम छायाचित्रकार होते. श्याम बेनेगल  यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. पालकांकडूनही त्याला प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे लहानपणापासूनच बेनेगल यांनी चित्रपट माध्यमाचा ध्यास घेतला. सरदारी बेगम, झुबेदा, मंथन असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. केंद्र सरकारने सन 1976 मध्ये पद्मश्री तर 1991 मध्ये पद्मभूषण देऊन बेनेगल यांचा सन्मान केला. 

अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर बेनेगल यांनी मोठ्या जाहिरात संस्थेत लेखनाचे काम केले. त्यानंतर जाहिरातपट आणि लघुपट यांच्यासाठी लेखन करतानाच त्यांनी या क्षेत्रातील तांत्रिक अंगांचा सखोल अभ्यास केला. होमी भाभा अधिछात्रवृत्ती घेऊन त्यांनी बोस्टन आणि न्यूयॉर्क येथील दूरदर्शन माध्यमांसाठी लहान मुलांचे लघुपट तयार केले. त्यानंतर त्यांनी भारतात येऊन अंकुर हा पहिला चित्रपट तयार केला. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

बेनेगल यांनी आपल्या कारकिर्दीत चरणदास चोर (१९७५), भूमिका (१९७७), कोंदुरा/अनुग्रहम (१९७८), जुनून (१९७९), कलयुग (१९८१), आरोहण (१९८३), मंडी (१९८३), त्रिकाल (१९८५), सुसमन (१९८७), अंतर्नाद (१९९१), सूरज का सातवा घोडा (१९९२), मम्मो (१९९४), सरदारी बेगम (१९९६), द मेकिंग ऑफ महात्मा (१९९६), समर (१९९८), हरीभरी (२०००), जुबेदा (२००१), नेताजी सुभाषचंद्र बोस (२००५), वेलकम टू सज्जनपूर (२००८), वेल डन अब्बा (२००९) अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

कलात्मक, समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट या शैलीची सांगड घालण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बेनेगल यांनी केले. एनएफडीसीसाठी त्यांनी काम केले. त्याचप्रमाणे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत त्यांनी अध्यापन केले. या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दादासाहेब फाळके पुरस्कारासह चित्रपटसृष्टीतील अनेक मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

बेनेगल यांनी नुकताच 90 वा वाढदिवस साजरा केला. मागील काही काळापासून ते आजारीच होते. या आजाराशी झगडतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading