Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

तरुणांनी भारतला अधिक चांगले बनवण्यासाठी योगदान द्यावे – नारायण मूर्ती

पुणे  : महात्मा गांधी, सरदार पटेल, लोकमान्य टिळक, गोपाल कृष्ण गोखले, जवाहरलाल नेहरू या सारख्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याचा लढा लढतांना मोठ्या प्रमाणात आपले कौटुंबिक सौख्य, संपत्ती, उत्तम करिअर आदी गोष्टींचा त्याग केला व देश आणि समाजहिताला प्राधान्य दिले. त्यामुळे आजच्या तरुणांनी आपल्या आजूबाजूला काय होत आहे याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ राहण्यापेक्षा देशाला पुढे नेण्यात योगदान द्यावे असा सल्ला पसिद्ध उद्योगपती व इन्फोसीसचे सह-संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांनी दिला. जे. पी. श्रॉफ फौंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. गणेश नटराजन यांनी नारायणमूर्ती यांची मुलखात घेतली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पर्यावरण पूरक शाश्वत विकास या क्षेत्रात उतुंग कामिगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना नारायणमूर्ती यांच्या हस्ते  ‘सस्टेनेबिलीटी क्रुसेडर अवार्ड’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये रवींद्र धारिया (वैयक्तिक कामासाठी), आलोक काळे (स्टार्टअप), देशमुख उद्योग (लघु व मध्यम उद्योग), इंदोर महानगरपालिका (शासकीय संस्था), जमशेद गोदरेज (कॉर्पोरेट) व डॉ. माधव गाडगीळ (जीवन गौरव) आदींचा समावेश होता. जे. पी. श्रॉफ फौंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष असून मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. गणेश नटराजन, आशिष गायकवाड, प्रदीप भार्गव व जे. पी. श्रॉफ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल असे डॉ नटराजन यांनी नारायणमूर्ती यांना विचारले असता ते म्हणाले की मला लहापणापासून शाळेतील शिक्षक व पालकांकडून कष्ट करण्याची तयारी, नैतिकता आणि स्वतः पेक्षा देश व समाजाला पुढे ठेवण्याचे बाळकडू देण्यात आले आणि मला या मुल्यांचा व  तत्वांचा आयुष्यात खूप फायदा झाला. त्यामुळे प्रत्येकाची पार्श्वभूमी व विचारसरणी वेगवेगळी असली तरी सर्वांनी या  मुलभूत तत्वांचे पालन करायले हवे असे नारायण मूर्ती म्हणाले. ज्यांचे जीवनमान चांगले आहे त्यांनी आपल्यापेक्षा खाली असलेल्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत करावी असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृवाखाली देश चांगल्या गतीने प्रगती करत असून पहिल्यांदाच आपला देश आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध घडामोडींवर आपल्या देशासाठी योग्य अशी भूमिका घेताना दिसतो आहे असे नारायणमूर्ती म्हणाले. पर्यावरणातील बदल, जागतिक तापमानवाढ, कार्बन उत्सर्जन यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी कॉर्पोरेट जगत, राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारी यंत्रणांचे एकत्रित प्रयत्न हवेत असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. आज आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर भारतातील काही भाग हे राहण्यायोग राहणार नाहीत व त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होईल व विविध समस्या निर्माण होतील. भारतात या सर्व प्रश्नांचा सामना करताना सौर उर्जेच्या निर्मितीत वाढ करणे नक्कीच हितावह ठरेल असे सांगून नारायणमूर्ती म्हणाले की लॉंग ड्यूरेशन स्टोरेज इक्विपमेंट विकसित करण्यावर व सोलर पॅनलच्या उपयोगातून वीज निर्मितीची प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यावर भारतीय संशोधकांनी भर द्यायला हवा.

यावेळी सस्टेन अँड सेव्ह च्या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण मानवारांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे. पी. श्रॉफ यांनी ‘सस्टेनेबिलीटी क्रुसेडर अवार्ड’ पुरस्कारांची पार्श्वभूमी सांगितली. देशपातळीवर पर्यावरण पूरक शाश्वत विकासाला चालना देण्यात मोठे योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ही पुरस्कार देण्यात येतो असे श्रॉफ म्हणाले.  प्रणती श्रॉफ मुनोत, अंकिता श्रॉफ सारडा व नम्रता धामणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading